Swastik Tarakpur Bus Service Pudhari
अहिल्यानगर

Swastik Tarakpur Bus Service: स्वस्तिक बसस्थानकात तारकपूरच्या प्रवाशांची कुचंबणा; ‘लोकलने जा’ म्हणत बसमधून उतरविल्याचा आरोप

स्वतंत्र लोकल बससेवा अपुरी; रुग्ण, विद्यार्थी, महिला आणि वयोवृद्धांना रिक्षासाठी १०० ते १५० रुपये मोजण्याची वेळ

पुढारी वृत्तसेवा

नगर तालुका: गाडी लांब पल्ल्याची आहे... लोकल गाडीने जा... तारकपूरला जाणाऱ्यांनी बसू नये... अशा प्रकारची उत्तरे देऊन प्रवाशांना खाली उतरविले जात असल्याचा प्रकार स्वस्तिक बसस्थानकात कायम पाहायला मिळत असून, स्वस्तिक बसस्थानक ते तारकपूर या मार्गावरील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याची मागणी जोर धरत आहे.

माळीवाडा बसस्थानकाचे काम सुरू असल्याने शहरातील एसटी वाहतुकीचे तात्पुरते विभाजन स्वस्तिक चौक बसस्थानक आणि तारकपूर बसस्थानकावर करण्यात आले आहे. मात्र, या व्यवस्थेचा सर्वाधिक फटका तारकपूर ते स्वस्तिक बसस्थानकादरम्यान प्रवास करणाऱ्या सामान्य नागरिकांना बसत आहे‌.

श्रीगोंदा, कर्जत, राशीन, जामखेड, पारनेर आदी भागांतून येणाऱ्या प्रवाशांना नाशिक, श्रीरामपूर, कोपरगाव, राहुरी, तसेच अन्य मार्गांवर जाण्यासाठी स्वस्तिक बसस्थानकातून तारकपूर येथे जावे लागते. मात्र, स्वस्तिक बसस्थानकातून तारकपूरकडे जाणाऱ्या लोकल बसेसची संख्या अत्यल्प असल्याने प्रवाशांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे.

वांबोरी, मिरीमार्गे शेवगाव जाणाऱ्या काही मोजक्या गाड्या वगळता स्वस्तिकहून तारकपूरकडे जाण्यासाठी स्वतंत्र लोकल सेवा उपलब्ध नसल्याने प्रवाशांना संभाजीनगर, धुळे, जळगाव, जालना आदी लांब पल्ल्याच्या गाड्यांवर अवलंबून राहावे लागत आहे. काही बसचालक व वाहकांकडून अल्प अंतराचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसमध्ये चढण्यास मज्जाव केला जात असल्याच्या तक्रारी आहेत.

गाडी लांब पल्ल्याची आहे. लोकल गाडीने जा. तारकपूरला जाणाऱ्यांनी बसू नये, अशा प्रकारची उत्तरे देऊन प्रवाशांना खाली उतरविले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. त्यामुळे विद्यार्थी, महिला, वयोवृद्ध, तसेच रुग्णांना तासन्‌तास बसस्थानकावर ताटकळत राहण्याची वेळ येत आहे.

तारकपूर परिसरात शासकीय जिल्हा रुग्णालय, तसेच खासगी रुग्णालये मोठ्या प्रमाणात असून, ग्रामीण भागातून उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. त्याचबरोबर या परिसरात विविध महाविद्यालये असल्याने दररोज विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांचीही मोठी वर्दळ असते. नांदगाव, शिंगवे, देहरे, विळद आदी गावांमधून शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांनाही तारकपूर–स्वस्तिक असा रोजचा प्रवास करावा लागतो. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याची मागणी जोर धरत आहे.

अल्प अंतराचा प्रवास असल्याने लांब पल्ल्याच्या बसमध्ये प्रवाशांना प्रवेश दिला जात नसेल तर एसटी महामंडळाने स्वस्तिक–तारकपूर दरम्यान पुरेशा प्रमाणात स्वतंत्र लोकल बसेस उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

विद्यार्थी, रुग्णांची रोजची कुचंबना! तारकपूर परिसरात मोठ्या प्रमाणात रुग्णालये आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातून उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. याशिवाय महिला महाविद्यालयासह विविध शैक्षणिक संस्था असल्याने विद्यार्थ्यांचीही मोठी ये-जा असते. बसमध्ये प्रवेश नाकारला गेल्याने रुग्ण, विद्यार्थिनी, महिला आणि वयोवृद्ध नागरिकांना रोजच मनःस्ताप सहन करावा लागत आहे.

प्रवाशांना घ्यावा लागतो रिक्षांचा आधार

तारकपूर बसस्थानकाकडे जाण्यासाठी शहर बससेवेचा पुरेसा पर्याय उपलब्ध नसल्याने प्रवाशांना रिक्षांचा आधार घ्यावा लागतो. एसटी बसचे तारकपूरपर्यंतचे तिकीट सुमारे १५ रुपये असताना रिक्षाचालकांकडून याच अंतरासाठी १०० ते १५० रुपयांपर्यंत स्पेशल भाडे आकारले जात असल्याची प्रवाशांची तक्रार आहे. त्यामुळे तात्पुरत्या बसस्थानक व्यवस्थेचा आर्थिक फटकाही सामान्य प्रवाशांना सहन करावा लागत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT