Sugar  Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar Sugar Price: अहिल्यानगरच्या साखर कारखान्यांत २.८३ लाख टन साखर शिल्लक; किरकोळ दर ८० रुपयांवर

काही दिवसांत दरात ३०-३५ रुपयांची वाढ; सणासुदीत साखर आणखी महागण्याची शक्यता, ऊस उत्पादकांना फायदा मिळणार का?

पुढारी वृत्तसेवा

नगर: जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे जुलैअखेर तब्बल 2 लाख 82 हजार 708 मेट्रिक टन साखर शिल्लक आहे. त्यातच काही दिवसात साखरेच्या दराने चांगलीच उसळी घेतली असून, तब्बल 30-35 रुपयांनी साखरेचे दर वाढले आहेत. त्यामुळे ‘स्टॉक मार्केट’च्या या गेममध्ये साखरेच्या वाढत्या दराचा खरेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना किती फायदा मिळणार, याविषयी वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत.

देशांतर्गत बाजारात साखरेच्या दरात मोठी वाढ झाली आहे. दि. 21 ऑगस्टपर्यंतच्या अहवालानुसार जिल्ह्यातील किरकोळ विक्रीचा दर हा प्रतिकिलो 75 ते 80 रुपयांवर गेला आहे. काही दिवसांत देशातील साखरेचे दर सुमारे 30-35 रुपयांपर्यंत वाढले आहेत. आता सणासुदीचा हंगाम जवळ येत असल्याने दर आणखी वाढू शकतात.

केंद्र सरकारचा वॉच, पण...

साखरेचा साठा होऊ नये, यासाठी केंद्र सरकारने साखरेच्या साठ्यावर नियंत्रण आणण्यासाठी व्यापाऱ्यांवर मर्यादा लागू केल्याची चर्चा आहे. मात्र, साखर साठा खरोखरच कमी आहे की कुठेतरी तो ‘स्टॉक’ केला जात आहे, याविषयी साशंकता आहे.

दरमहिन्याला 22 लाख टन गरज

यंदा देशात 335 लाख मे टन साखर उत्पादन अपेक्षित असताना प्रत्यक्षात ते 280 लाख मे टन झाले. देशात दर महिन्याला 22 लाख मे टन साखर लागते. असे असताना, अनेक कारखान्यांनी साखरेऐवजी इथेनॉलला प्राधान्य दिले. अगोदरच कमी दिवस गाळप चालले, नैसर्गिक संकटामुळे उत्पादनही घटले, त्यामुळे पांढरी साखर अपेक्षित उत्पादन वाढले नाही. त्यामुळे ही दरवाढ असल्याचे चित्र आहे. ब्राझीलचीही तीच परिस्थिती आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरही साखर कमीच असून, साखरेचे दर वाढलेले असल्याचे जाणकार सांगतात.

सणासुदीलाही ‘साखर’ कडूच?

पुढच्या वर्षीही अलनिलनोमुळे उत्पादन घटण्याची भिती आहे. चालू वर्षी ज्यावेळी हंगाम समाप्त होतो, त्यावेळी पुढचा हंगाम सुरू होताना साखरेचा साठा हा साधारणतः देशात 50 लाख मे टन ओपनिंग बॅलन्स असावा लागतो. मात्र सध्याची परिस्थिती पाहता तो यावर्षी असणार नाही. अजुन सप्टेंबर जायचा आहे. नवीन साखरेचा हंगाम ऑक्टोबरमध्ये सुरू होतो. सणासुदीत विशेषतः गणपती, नवरात्र, त्यानंतर दिवाळीमुळे मागणी वाढती असणार आहे. सध्याचा साखर स्टॉक लक्षात घेता मागणी आणि पुरवठा यामध्ये तफावत दिसू शकेल. त्यामुळे साखरेचे दर वाढू शकतात, असे बोलले जाते.

सध्या सप्टेंबरपर्यंत साखर पुरेल असे बोलले जाते. मात्र, साखरेचा ‘खेळ’ चर्चेचा विषय बनला आहे. जर काही व्यापाऱ्यांनी 1 लाख साखर पोती 5000-5200 दराने खरेदी करून ठेवली असताना, तोच व्यापाऱ्यानी जाणीवपूर्वक 10 हजार पोती मात्र 6100-6500 रुपये दराने खरेदी करतो. तोच जाणीवपूर्वक असे भाव वाढवतो आणि यातून त्याने पूर्वी खरेदी करून ठेवलेल्या 1 लाख साखर पोत्यांची या चढ्या दराने विक्री करून पैसे कमावतो, असेही बोलले जाते.

शेतकऱ्यांना दोन पैसे मिळणार का?

सध्या साखरेचे दर वाढल्याने शेतकरी आनंदी आहे. मात्र, वाढलेल्या दराचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा मिळेल का, कारखानदार मिळणाऱ्या नफ्यातून ऊस उत्पादकांना दिवाळीला वाढीव पेमेंट देतील का, याविषयी साशंकता आहे. ऊस गाळप सुरू झाले की दर पडतात हा इतिहास आहेच. त्यात, कारखान्यांमध्ये दिसणारा ‘स्टॉक’ हा कागदावरच आहे, की गोडावूनमध्येही पहायला मिळू शकतो, याची शहानिशा झाल्यास हा ‘खेळ’ उघडा पडू शकतो.

यंदाचे गाळप महिनाभर अगोदरच?

साखरेचा पुरवठा कमी असल्याने कदाचित यावर्षीचा गाळप हंगाम हा दि. 1 ऑक्टोबरपासूनच महिनाभर अगोदरच सुरू होऊ शकतो. मात्र, ऑक्टोबरमध्ये परतीचा पाऊस असतो. शेतात पाणी असते. थंडी न पडल्यामुळे साखर तयार होत नाही. पुढचा हंगामात एक-दोन महिने कमी साखरेचे ऊस गाळप करावे लागेल. त्यामुळे उत्पादन कमी होईल, ही भिती आहे. त्यामुळे पुढच्या वर्षीही साखरेचे उत्पादन व मागणी यामध्ये तफावत दिसू शकते, त्याचे दरावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT