नगर: भटक्या श्वानांचा उपद्रव वाढतच आहे. गेल्या पाच वर्षांत राज्यात तब्बल 47 लाख 37 हजार 763 जणांना श्वानांनी चावा घेतला असून, यात अहिल्यानगरच्या 3 लाख 26 हजार 781 नागरिकांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. या आकडेवारीनुसार अहिल्यानगरचा या विभागात तिसरा नंबर असल्याचे समोर आले आहे.
दोन दिवसांपूर्वी श्रीगोंदा आणि पारनेर तालुक्यातील तिघांवर भटक्या श्वानांनी हल्ला चढवत त्यांना गंभीर जखमी केल्याची घटना घडली. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याशिवाय, जिल्ह्यात दररोज 75 ते 80 नागरिक कुत्रे चावल्यानंतरची लस घेण्यासाठी येत आहेत. यावरून जिल्ह्यातही भटक्या श्वानांची समस्या किती गंभीर बनली आहे, हे दिसून येते.
दरम्यान, राज्यात सन 2021 ते 2025 या पाच वर्षांच्या कालावधीत 35 जिल्ह्यांमध्ये 47 लाख नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला असून, त्यांना लसीकरण करून घ्यावे लागले आहे. त्यापाठोपाठ 4 लाख 66 हजार 392 जणांना मांजरीने चावा घेतला आहे, तर 43 हजार 955 व्यक्तींना माकडाने चावा घेतल्याची माहिती पुढे आली आहे. मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ते कमलाकर दरवडे याबाबत माहिती अधिकारात माहिती घेतली आहे. आरोग्य सेवा संचलनालय पुणे आणि मुंबई महापालिका यांच्याकडून ही माहिती प्राप्त आहे.
भटके कुत्रे यांच्यासह विविध प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये मागील पाच वर्षात 134 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, अजुनही श्वानांचे हल्ले रोखण्यासाठी प्रशासन गतीमान नसल्याचे दिसत आहे.
भटक्या श्वानांचे निर्जीबीकरण, लसीकरण, रेल्वेस्थानके, बसस्थानके, शाळा, रुग्णालय परिसरातून भटके श्वान तातडीने हटवण्याच्या न्यायालयाच्या सूचना आहेत. परंतु याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
मुंबई-ठाणे अन् नगर
भटक्या श्वानांनी चावा घेतलेल्या नागरिकांच्या संख्येत मुंबई (5 लाख 29 हजार 650) पहिल्या स्थानी, ठाणे (4 लाख 5 हजार 436) दुसऱ्या स्थानी, तर अहिल्यानगर (3 लाख 26 हजार 781) तिसऱ्या स्थानी असल्याची गंभीर बाबही समोर येत आहे.