ST Bus Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar ST Bus Diesel Issue: अहिल्यानगरमध्ये एसटीला डिझेलचा फटका; तारकपूर- अकोले आगारातील फेऱ्या बाधित

करार संपल्याने पुरवठा विस्कळीत; ग्रामीण विद्यार्थ्यांचे हाल, फेऱ्यांमध्ये कपात

पुढारी वृत्तसेवा

नगर: भारत पेट्रोलियम कंपनीबरोबर करण्यात आलेला डिझेल पुरवठ्याचा करार संपल्यामुळे तारकपूर व अकोले एसटी डेपोंच्या अडचणी वाढल्या आहेत. या दोन्ही डेपोंतील बसला डिझेल भरण्यासाठी इतर तालुक्यातील डेपोच्या पेट्रोल पंपावर रांगा लावाव्या लागत आहेत. त्यामुळे बस फेरीचे नियोजन कोलमडले आहे. परिणामी तारकपूर आगाराने ग्रामीण भागातील काही फेऱ्या बंद केल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी, ग्रामीण जनतेचे हाल सुरू आहेत.

एसटी महामंडळाच्या अहिल्यानगर विभागात अकरा आगार असून सध्या 629 बसच्या दिवसासाठी 4 हजार फेऱ्या होतात. यासाठी तारकपूर व अकोले आगारांतील बसला डिझेल पुरवठा भारत पेट्रोलियम कंपनीकडून तर उर्वरित नऊ आगारातील बसला इंडियन ऑईल कंपनीकडून इंधन पुरवठा केला जात आहे. 629 बसच्या चारशे फेऱ्यांसाठी दिवसाकाठी 50 हजार लिटर डिझेलचा वापर केला जात आहे.

सध्या आखाती देशांत युद्धजन्य परिस्थिती सुरू आहे. त्यामुळे घरगुती व व्यावसायिक सिलिंडरचा जिल्ह्यात तुटवडा निर्माण झाला आहे. पेट्रोल आणि डिझेलची अद्याप झळ जाणवलेली नाही. मात्र, गॅसवर चालणाऱ्या रिक्षांना तुटवडा जाणवत आहे. एसटी महामंडळाच्या तारकपूर व अकोले डेपोला मात्र डिझेल करार संपल्याने झळ बसली आहे. याचा फटका विद्यार्थ्यांना अधिक बसला आहे. नगर शहरात शाळा, महाविद्यालये असल्यामुळे बहुतांश विद्यार्थी-विद्यार्थिनी बसने ये‌’-जा करतात. तारकपूर आगारातून ग्रामीण भागातील गावांना तसेच राज्यात बस सोडल्या जात आहेत.

या आगारातून दिवसाकाठी 82 बसच्या 450 फेऱ्या होतात. हे आगार सर्वात मोठे आहे. त्यामुळे या आगारात डिझेलचा पुरवठा सध्या करार संपल्याने बंद आहे. त्यामुळे येथील बससाठी दुसऱ्या ठिकाणाहून डिझेल घेण्याची वेळ आली आहे. अशा वेळी डिझेल मिळण्यास विलंब होत आहे. परिणामी ग्रामीण भागातील मुक्कामी बसच्या फेऱ्या बंद करण्याची वेळ महामंडळावर आली आहे. जोपर्यंत करार प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत बसच्या फेऱ्यात कपात होऊन ग्रामीण विद्यार्थी, जनतेचे हाल सुरूच राहणार आहेत.

नव्याने करार प्रक्रिया सुरू

एसटी महामंडळाच्या बसला डिझेल तुटवडा नाही. तारकपूर व अकोले आगारांतील बससाठी भारत पेट्रोलियम कंपनीबरोबर करार केलेला असून, त्याची मुदत संपली आहे. नव्याने करार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तोपर्यंत तारकपूर व अकोले आगारांतील बससाठी इतर आगारांतून डिझेल उपलब्ध करून दिले आहे. शनिवारी व रविवारी तसेच इतर सुट्टीत शालेय बस फेऱ्या बंद ठेवण्यात येतात. इतर ठिकाणी फेऱ्या सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे अहिल्यानगर विभाग नियंत्रक राजेंद्र जगताप यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT