नगर: स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने जेऊर शिवारातील, सोलर केबलची चोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील चार आरोपींना जेरबंद केले. त्यांच्याकडून तीन चोरीचे गुन्हे उघडकीस आणून 9 लाख 91 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
संतोष अशोक जाधव (रा. प्रवरासंगम ता. नेवासा), करण वैश्य भोसले (रा. भेंडाळा ता. गंगापूर), मनोज सुनील लिंभोरे (रा.प्रवरासंगम ता.नेवासा), परमेश्वर वैश्य भोसले ( रा. भेंडाळा ता. गंगापूर) असे आरोपींची नावे आहेत.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, 18 मार्च 2026 रोजी सायंकाळी व 19 मार्च रोजी जेऊर येथील डोंगरावरील सोलार कंपनीचे 6500 मिटर केबल, 1500 सोलर केबल, 4 केबल काळ्या रंगाची (कॉपरची तार असलेली) कोणीतरी चोरून नेले. याबाबत सोमनाथ काशिनाथ तोडमल (रा. जेऊर बायजाबाई) यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याने पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना गुन्ह्याची उकल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार कबाडी यांनी उपनिरीक्षक अनंत सालगुडे, संदीप मुरकुटे, पोलिस अंमलदार विष्णू भागवत, अतुल लोटके, फुरकान शेख, रिचर्ड गायकवाड, भगवान थोरात, विशाल तनपुरे, प्रशांत राठोड, महिला पोलीस अंमलदार सोनल भागवत, चालक अरुण मोरे यांचे पथक तयार करून आरोपीच्या शोधाकामी रवाना केले. वरील गुन्हा रेकॉर्डवरील आरोपी संतोष अशोक जाधव (रा. प्रवरासंगम ता. नेवासा) याने साथीदारांसह केला असून, सध्या तो शेंडी बायपास रोडने पिकअप व दुचाकीवरून तांब्याची तार विक्री करण्यासाठी जात आहे, अशी माहिती मिळाली.
त्यानुसार पथकाने तत्काळ शेंडी बायपास रोडलगत किनारा हॉटेलजवळ सापळा रचून पिकअप व दुचाकीला थांबविली. त्यातून चौघांना ताब्यात घेतले. त्यांना नावे विचारली असता त्यांनी वरीलप्रमाणे नावे सांगितली. आरोपी संतोष जाधव यास विश्वासात घेऊन गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबली दिली. आरोपींच्या ताब्यातून 2 लाखांची 200 किलो ग्रॅम वजनाचे तांब्याचे धातुचे तारा, 7 लाखांचा पिकअप, मोटारसायकल, कटर, एक स्क्रू ड्रायव्हर, मोबाईल असा 9 लाख 91 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.