श्रीरामपूर: शहरातील नेवासा रोडवरील रेल्वे ओव्हरब्रिज येथे काल सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ट्रक आणि इलेक्ट्रिक दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात बेलापूर येथील कार्तिक भंडारी (वय 18) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. कार्तिक परीक्षा देण्यासाठी जात असताना हा अपघात घडला.
ट्रक क्रमांक एमएच 50-3877 आणि ओला कंपनीची इलेक्ट्रिक दुचाकी यांची धडक झाल्यानंतर दुचाकी ट्रकच्या चाकाखाली अडकली. या अपघातात कार्तिक भंडारी गंभीर जखमी झाला. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्याला माहिती दिली.
पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. वाहतूक सुरळीत करत नागरिकांच्या मदतीने जखमी कार्तिकला साखर कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र प्रकृती चिंताजनक झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी लोणी प्रवरा रुग्णालयात हलविण्यात आले. उपचारादरम्यान कार्तिकचा मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. याच रेल्वे ओव्हरब्रिजवर काही दिवसांपूर्वी एका महिलेचा अपघातात मृत्यू झाला होता. मागील महिन्यात चार ते पाच अपघात होऊन यात पाच बळी गेले आहेत.
आणि काल पुन्हा त्याच ठिकाणी अशाच प्रकारचा अपघात घडल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. ओव्हरब्रिजवर वाहनांची ये-जा धोकादायक होत असून, दोन्ही बाजूंना स्वतंत्र मार्गीका तयार करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.