Corruption Pudhari
अहिल्यानगर

Land Record Office Corruption: शेवगाव भूमी अभिलेख कार्यालयावर भ्रष्टाचाराचे आरोप

झेरॉक्स, नकाशे आणि अर्ज प्रक्रियेत नागरिकांची आर्थिक लूट होत असल्याची तक्रार

पुढारी वृत्तसेवा

बोधेगाव: शेवगाव येथील भूमी अभिलेख कार्यालयाच्या कार्यपद्धतीबाबत नागरिकांमधून वाढत्या तक्रारी समोर येत आहेत. या कार्यालयातील कामकाज संथ असून वजन ठेवल्याशिवाय अर्ज पुढे सरकत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. तसेच विविध मार्गांनी नागरिकांची आर्थिक लूट होत असल्याच्याही तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत.

कार्यालयीन कामकाजासाठी नकाशांच्या नकला मागितल्यास कार्यालयात झेरॉक्स मशीन नसल्याचे सांगितले जाते. त्यानंतर संबंधित नागरिकांना ठराविक बाहेरील झेरॉक्स दुकानातून अव्वाच्या सव्वा दराने प्रती काढण्यास भाग पाडले जात असल्याची चर्चा आहे.

शेवगाव न्यायालयात वकिलांकडे कार्यरत असलेले राजेंद्र डाके यांनी चार नकाशांच्या झेरॉक्ससाठी तब्बल 800 रुपये खर्च केल्याचे सांगितले. याशिवाय नक्कल फी म्हणून कार्यालयात स्वतंत्रपणे 732 रुपये भरावे लागल्याचे त्यांनी नमूद केले. या पार्श्वभूमीवर डाके यांनी बुधवारी (दि. 13) भूमी अभिलेख कार्यालयाकडे झेरॉक्स मशीन उपलब्ध करून देण्याची मागणी करत गांधीगिरी केले.

कार्यालयातील महत्त्वाची कागदपत्रे कार्यालयाबाहेर नेणे कितपत योग्य आहे, याची चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे. कारण शासकीय कामाच्या निमित्ताने बाहेर गेलेली महत्त्वाची कागदपत्रे हरवण्याचा धोका नाकारता येत नाही. काही वर्षांपूर्वी शेवगाव तहसील कार्यालय येथील रेकॉर्ड रूममधून नकला देण्यासाठी झेरॉक्सच्या कारणाने बाहेर गेलेली काही मूळ कागदपत्रे पुन्हा रेकॉर्ड रूममध्ये परतच आली नव्हती.

निवडणूक काळात घडलेल्या या प्रकारामुळे पुराव्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे गायब झाली होती. या प्रकरणात तत्कालीन कर्मचाऱ्यांवर कारवाई होऊन काहींना नोकरीही गमवावी लागल्याचे सांगितले जाते. दरम्यान, भूमी अभिलेख कार्यालय परिसरात एजंटांचा सुळसुळाट वाढल्याची चर्चा असून नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT