नगर: महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखेच्या नगर जिल्हा प्रतिनिधीपदी पदावरून वादंग निर्माण झाले आहे. प्रा. गणेश भगत यांच्या बिनविरोध निवडीस नगर शाखेच्या वतीने आक्षेप घेण्यात आला आहे. त्यामुळे नगर येथील साहित्यिक क्षेत्रातील वाद चव्हाट्यावर आला आहे. मात्र, जिल्हा प्रतिनिधी म्हणून जयंत येलूलकर यांच्या निवडीचे समर्थक करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील मराठी भाषेची पालक संस्था असलेल्या पुणे येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या जिल्हा प्रमुखपदांच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत येथील महाराष्ट्र साहित्य परिषद, सावेडी उपनगर शाखेचे प्रमुख कार्यवाह व रसिक ग्रुपचे अध्यक्ष जयंत येलुलकर व गणराज प्रकाशनचे प्रा. गणेश भगत यांची जिल्हाप्रमुखपदी बिनविरोध निवड झालेली आहे.
या निवडीवरुन नगर येथील साहित्यिकांमधील वाद पुढे आला आहे. प्रा. भगत यांच्या या निवडीस मसाप नगर शाखेने आक्षेप घेत कार्याध्यक्ष प्राचार्य डॉ. चंद्रकांत जोशी, उपाध्यक्ष प्रा. दशरथ खोसे, प्रमुख कार्यवाह शिल्पा रसाळ, सहकार्यवाह डॉ. श्याम शिंदे व खजिनदार डॉ. शीतल म्हस्के यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना व मसापचे अध्यक्ष प्रा. डॉ. मिलिंद जोशी यांना पत्र पाठविले आहे.
पुणे येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. मात्र, तत्पूर्वी जिल्हा प्रतिनिधीची निवड बिनविरोध झाली. या संदर्भात यापूर्वीचे जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत पालवे व अध्यक्ष किशोर मरकड यांनी शाखेच्या कार्यकारणीस अंधारात ठेवले. जिल्हा प्रतिनिधींची निवड होत असताना पदाधिकाऱ्यांना काहीही माहिती देण्यात आली नाही. या निवडीसाठी एकच अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल झाला म्हणून ही निवड बिनविरोध झाल्याचे मसाप पुण्याच्या वतीने सांगण्यात आले.
मात्र, या पदासाठी अनेक उमेदवार इच्छुक असूनही त्यांच्यापर्यंत सदर निवडीची माहिती पोहोचवण्यात आली नाही किंबहुना त्यांना ही माहिती कळू नये यासाठी प्रयत्न केले गेले. वृत्तपत्रात जाहिरात दिल्याचे कळलेही नसल्याचे पत्रात नमूद करत प्रा. भगत यांच्या निवडीस आक्षेप घेण्यात आला आहे. जिल्हा प्रतिनिधी म्हणून जयंत येलूलकर यांच्या झालेल्या निवडीस आमचा विरोध नसल्याचे डॉ. जोशी, खोसे, रसाळ, शिंदे व म्हस्के यांनी पत्रात म्हटले आहे.