Ahilyanagar cleanliness rank
नगर: केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शहरी सन 2024 च्या स्वच्छ सर्वेक्षणाचे निकाल जाहीर झाले आहेत. यात 3 ते 10 लाख लोकसंख्या असलेल्या शहरांच्या गटामध्ये अहिल्यानगर शहराचा देशात पाचवा, तसेच राज्यात चौथा क्रमांक आला आहे.
जलस्रोत, निवासी व मार्केट परिसर, शौचालयांची स्वच्छता आदींमध्ये अहिल्यानगर महापालिकेने केलेल्या कामगिरीत अव्वल गुणांकन देण्यात आले आहे. स्वच्छ शहरांमध्ये यंदाही थ्री स्टार मानांकन देण्यात आले आहे. महापालिकेचे सर्व सफाई कामगार, इतर कर्मचारी, अधिकारी व नागरिकांच्या सक्रिय सहकार्यामुळे हे यश मिळाल्याचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले. (Latest Ahilyanagar News)
मागील वर्षअखेरीस झालेल्या सर्वेक्षणात शहरातील स्वच्छतागृहे, कचरा डेपोतील प्रक्रिया केंद्र, डम्पिंग साईट, शहरातील दैनंदिन साफसफाई, जलस्रोत आदींच्या स्वच्छतेची तपासणी करण्यात आली. यात देशामध्ये पाचवा क्रमांक आला आहे. तसेच, राज्यातील शहरांमध्ये नगर चौथ्या क्रमांकावर आहे, असे डांगे यांनी सांगितले.
कचरा संकलन ठेकेदाराला मुदतवाढ नाही
गेल्या काही दिवसांपासून घरातून होणार्या कचरा संकलनात त्रुटी निर्माण झाल्या आहेत. ठेकेदार संस्थेकडून वाहनांची संख्या न वाढवण्यात आल्याने अनेक ठिकाणी कचरा संकलन सेवा विस्कळीत झाली आहे. यात उपाययोजना करून सेवा सुरळीत केल्या जात आहेत. सध्याच्या ठेकेदार संस्थेला मुदतवाढ न देता नवीन संस्था लवकरच नियुक्त केली जाणार असल्याचेही आयुक्त डांगे यांनी स्पष्ट केले.