नगर तालुका: तालुक्यातील एका शेतकरी कुटुंबाची खासगी सावकाराने सुमारे तीन एकर शेती बळकावल्याचा आरोप उपनिबंधक, तसेच जिल्हा पोलिस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आला आहे. नामदेव उमाप, उत्तम उमाप, वसंत उमाप, ताराबाई वाघमारे यांनी याबाबत निवेदन दिले असून, निवेदनामध्ये खासगी सावकारकीबाबत विविध आरोप करण्यात आले आहेत.
निवेदनानुसार अर्जदारांनी २०१६मध्ये आर्थिक अडचणीमुळे खासगी सावकाराकडून व्याजाने रक्कम घेतली होती. त्यानंतर मूळ रकमेपेक्षा अनेक पटींनी अधिक रकमेची मागणी करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. व्याजाच्या व्यवहारातून दबाव निर्माण करून त्यांच्या मालकीच्या शेतीसंदर्भातील कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या घेण्यात आल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
संबंधित व्यवहारात त्यांच्या कुटुंबातील सर्व वारसांची संमती नसताना जमिनीचे दस्तऐवज तयार करण्यात आले. कोळपे आखाडा परिसरातील सुमारे तीन एकर शेती संबंधित सावकाराने खासगी सावकारकीच्या पैशातून बळकावल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संपूर्ण व्यवहाराची वरिष्ठ पातळीवरून चौकशी केल्यास सर्व बाबींचा उलगडा होईल, असेही नमूद करण्यात आले आहे.
जमीन परत मिळविण्यासाठी प्रयत्न केल्यानंतर त्यांना वारंवार मानसिक त्रास, दबाव व धमक्या दिल्या जात आहेत. या जमिनीची परस्पर विक्री केल्यानंतर त्याबाबत विचारणा केली असता जातिवाचक शिवीगाळ करून धमकावल्याचाही निवेदनात उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण कुटुंब भयभीत वातावरणात जीवन जगत असल्याचा उल्लेख अर्जात करण्यात आला आहे. या प्रकारामुळे कुटुंबाच्या उपजीविकेचे प्रमुख साधन असलेली शेती हिरावली गेल्याने मोठे आर्थिक संकट ओढवल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
या जमिनीचा व्यवहार संपूर्णपणे खासगी सावकारकीतूनच झालेला आहे. संबंधित सावकाराचे ठरलेल्या व्याजासह पैसे देण्याची तयारी दाखवूनही जमिनीची परस्पर विक्री करण्यात आली आहे. खासगी सावकारकीबाबतचे सर्व पुरावे आहेत. तसेच व्यवहारात असणाऱ्या मध्यस्थांनाही संपूर्ण प्रकरणाची माहिती आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून न्याय मिळणे गरजेचे आहे; अन्यथा संघटनेमार्फत कुटुंबीयांसह आमरण उपोषण करण्यात येईल.वसंत उमाप