Coaching Classes Fees Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar Private Classes Regulation: अहिल्यानगरमध्ये खासगी क्लासेसवर कारवाईची तयारी; शिक्षण विभागाचे तपासणी आदेश

पालकांची लूट, नियमभंग आणि नोंदणीअभावी क्लासेसवर बंधने; शासनाकडून कायदा अंतिम टप्प्यात

पुढारी वृत्तसेवा

नगर: कोणालाही न जुमानता पालकांची सर्रास लूट करणाऱ्या खासगी क्लास चालकांवर लवकरच बंधने येणार आहेत. त्यासाठी शासनाकडून तसा कायदा करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. तत्पूर्वी, ‌‘पुढारी‌’मधून प्रसिद्ध झालेल्या खासगी क्लास चालकांच्या मनमानीबाबतच्या वृत्ताची शिक्षण विभागाने गंभीर दखल घेतली आहे. खासगी क्लासला भेटी देऊन तपासणी करण्याच्या सूचना माध्यमिक शिक्षण विभागाला करण्यात येणार असल्याचे विभागीय शिक्षण उपसंचालक डॉ. गणपत मोरे यांनी ‌‘पुढारी‌’शी बोलताना सांगितले.

नगर शहरात 67 पेक्षा अधिक खासगी क्लास आहेत. खासगी क्लासवर प्रशासनाने नियंत्रण आणावे, एकाच वर्गात मर्यादीत विद्यार्थी बसवावेत, त्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांची पात्रताही योग्य असावी. विद्यार्थ्यांचे वसतिगृह, भोजन व्यवस्था यासह अन्य भौतिक सुविधा याकडेही गांभीर्याने पाहिले जावे. विशेष म्हणजे मनपा किंवा शिक्षण विभागाची कोणतेही परवानगी न घेता अशाप्रकारे हे नियमबाह्य क्लास चालू करणाऱ्यांवर कारवाई करावी, या हेतूने दै. पुढारीने प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. याबाबत मनपा प्रशासन हातावर हात ठेवून आहे. अशावेळी शिक्षण विभागाने दोन पाऊले पुढे येत याबाबत निर्णय घेतला.

उपसंचालक डॉ. मोरे यांनी सांगितले आहे की, सध्या खासगी क्लासवर शासनाचे नियंत्रण आहे. त्याचे कायद्यात रुपांतर होणार आहे. त्याचे कामही अंतिम टप्प्यात आहे. खासगी क्लासची नोंदणी ही शॉप ॲक्टप्रमाणे बंधनकारक आहे. ती शिक्षण विभागाकडे केली जात नाही, हेही खरे आहे. त्याची फीबाबतही नियंत्रण नाही, हेही माहिती आहे.

त्यामुळे शासन याबाबत धोरण ठरवत आहे. शासनाचे पूर्ण नियंत्रण असले तरीही शिक्षण विभागालाही काही अधिकार आहेतच. माध्यमिक शिक्षण विभागाला तक्रारींच्या चौकशीचा अधिकार आहेच. याशिवाय आपण आता, किती खासगी क्लास आहेत, त्यांच्याकडे कोणते परवाने आहेत, किती विद्यार्थी आहेत, त्यांची व्यवस्था कशी आहे, याबाबत सुमोटो तपासणी करू शकतो. माध्यमिक शिक्षण विभागाला तशा सूचना केल्या जातील.

तपासणीनंतरच किती अधिकृत व किती बेकायदा क्लास चालवले जातात, हे समोर येईल. कारवाईचा निर्णय शासनाच्या धोरणानुसार घेतला जाईल, असेही मोरे यांनी सांगितले. दरम्यान, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही खासगी क्लाससंदर्भात गांभीर्य व्यक्त केले आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांचे याकडे लक्ष वेधल्याचे समजते. आता शिक्षण विभागानेही पावले उचलली आहेत. त्यामुळे या मोहिमेकडे जिल्ह्यातील पालकांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT