Police Station  Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar Police Transfers: अहिल्यानगर पोलिस दलातील बदल्यांवर नाराजी; पसंतीच्या ठिकाणी नियुक्ती न मिळाल्याने कर्मचारी अस्वस्थ

३०० अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या; सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या पोलिसांच्या अडचणींकडे दुर्लक्ष झाल्याची भावना

पुढारी वृत्तसेवा

नगर तालुका: जिल्हा पोलिस दलातील प्रशासकीय बदल्यांच्या आदेशानंतर पोलिस वर्तुळात नाराजीची चर्चा रंगली आहे. विशेषतः पोलिस हवालदार, सहाक फौजदार तसेच पदोन्नतीवर पोलिस उपनिरीक्षक झालेल्या काही अधिकाऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या पोलिस ठाण्यावर नियुक्ती न मिळाल्याने नाराजी वाढल्याचे बोलले जात आहे. सेवेच्या अखेरच्या टप्प्यात असलेल्या कर्मचाऱ्यांच्या अडचणींचा पुरेसा विचार झाला नसल्याची भावना व्यक्त होत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

जिल्हा पोलिस दलातील सुमारे ३०० अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्यांचे आदेश नुकतेच काढण्यात आले. या बदल्यांमध्ये पोलिस उपनिरीक्षक, सहाक पोलिस उपनिरीक्षक, सहाक फौजदार, पोलिस हवालदार आणि शिपाई यांचा समावेश आहे. यापैकी सुमारे ७० कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना एका वर्षासाठी स्थगिती देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

प्रशासकीय बदली प्रक्रियेत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून तीन पसंतीची पोलिस ठाणे मागविली जातात. संबंधित ठिकाणी जागा उपलब्ध नसल्यास कर्मचाऱ्यांशी चर्चा करून पर्यायी पोलिस ठाणे देण्याची पद्धत असल्याचे सांगितले जाते. मात्र, बदली प्रक्रियेत अनेकांना त्यांनी नमूद केलेल्या कोणत्याही पसंतीच्या ठिकाणी नियुक्ती मिळाली नसल्याची चर्चा पोलीस दलात सुरू आहे.

विशेष म्हणजे, हवालदार, सहाक फौजदार, तसेच पदोन्नतीवर पोलिस उपनिरीक्षक झालेल्या अनेक अधिकारी-कर्मचाऱ्यांची पुढील पाच ते सहा वर्षांत सेवानिवृत्ती होणार आहे. या काळात मुलांचे उच्च शिक्षण, विवाह, वृद्ध पालकांची जबाबदारी, स्वतःचे आरोग्य आणि कौटुंबिक अडचणी लक्षात घेता सेवेच्या अखेरच्या टप्प्यात घराजवळील किंवा पसंतीच्या पोलीस ठाण्यावर नियुक्ती मिळावी, अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र, तसे न झाल्याने अनेकांनी खासगीत नाराजी व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे.

पदोन्नतीवर पोलिस उपनिरीक्षक झालेल्या काही अधिकाऱ्यांमध्येही नाराजी असल्याची चर्चा आहे. इच्छित किंवा सोयीच्या ठिकाणी नियुक्ती न मिळाल्याने अनेकांचा अपेक्षाभंग झाल्याचे बोलले जात आहे. सेवेच्या अखेरच्या टप्प्यातील वैयक्तिक व कौटुंबिक परिस्थितीचाही विचार व्हायला हवा होता.अशी भावना काही अधिकारी व्यक्त करत असल्याचे समजते.

काही कर्मचारी या बदल्यांविरोधात न्यायालयात दाद मागण्याच्या तयारीत असल्याची चर्चा असून काही जण उर्वरित सेवा पूर्ण करण्याऐवजी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारण्याचाही विचार करत असल्याचे पोलीस वर्तुळात बोलले जात आहे.

दरम्यान, संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक अडचणींचा विचार करून आवश्यक त्या बदल्यांचा फेरविचार करावा, अशी मागणी पोलिस दलातील काही कर्मचाऱ्यांकडून होत असल्याची चर्चा आहे. या बदल्यांबाबत वरिष्ठ स्तरावर पुनर्विचार होणार का ? याकडे आता लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT