Police Mock Drill Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar Police Security: अहिल्यानगर पोलिसांचा ‘दंगा काबू’चा सराव; १८० पोलिसांचा रूट मार्च, समाजकंटकांवर तडीपारीची कारवाई

ईद-ए-मिलाद ते दहीहंडीपर्यंत उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलिस सतर्क; दिल्ली गेट परिसरात अश्रुधुराच्या वापराचे प्रात्यक्षिक

पुढारी वृत्तसेवा

नगर: येत्‍या काही दिवसांवर येऊन ठेपलेले विविध धर्मीय सण व उत्सव शांततेत आणि कायदा-सुव्यवस्थेच्या वातावरणात पार पडावेत, यासाठी अहिल्यानगर शहर पोलिस दल पूर्णपणे सतर्क झाले आहे. शनिवारी (दि.२२) अहिल्‍यानगर शहरात 'दंगा काबू' योजनेची रंगीत तालीम (मॉक ड्रिल) घेण्यासोबतच प्रमुख मार्गांवरून दणदणीत रूट मार्च काढण्यात आला.

अहिल्‍यानगर शहरात येत्‍या काही दिवसांत धार्मिक व सांस्कृतिक उत्सव साजरे होणार आहेत. या सर्व उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, या दृष्टीने पोलिस अधीक्षक सुदर्शन मुम्मका व अपर पोलिस अधीक्षक वैभव कलुबरमे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे, कोतवाली पोलिस स्टेशन, तोफखाना पोलिस स्टेशन व भिंगार कॅम्प पोलिस स्टेशनच्या पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शनिवारी सायंकाळी विशेष सराव मोहीम राबवण्यात आली.

नगर पोलिस मुख्यालय आणि दिल्ली गेट परिसरात 'दंगा काबू' योजनेची रंगीत तालीम पार पडली. या दरम्यान दिल्ली गेट येथे अचानक दंगल किंवा अनुचित प्रकार घडल्यास परिस्थितीवर नियंत्रण कसे मिळवावे, याचे प्रात्यक्षिक करण्यात आले. यादरम्यान दारूगोळा उडवून आणि अश्रूधुराचा वापर करून परिस्थिती हाताळण्याचा पोलीस दलाने प्रत्यक्ष सराव केला.

प्रात्यक्षिकानंतर दिल्ली गेट येथून रूट मार्चला प्रारंभ झाला. हा रूट मार्च दिल्ली गेट, चितळे रोड, लक्ष्मी कारंजा, महाजन गल्ली, तकती दरवाजामार्गे कोतवाली पोलिस स्टेशन या मुख्य व संवेदनशील मार्गांवरून काढण्यात आला. या मोहिमेत पोलिस दलाची मोठी तुकडी सहभागी झाली होती. यामध्ये कोतवाली, तोफखाना, भिंगार कॅम्प पोलिस ठाणे, पोलिस मुख्यालय, नियंत्रण कक्ष, आरसीपी (RCP) प्लाटून आणि एसआरपीएफ (SRPF) प्लाटूनचे १२ पोलिस अधिकारी आणि १८० पोलिस अंमलदार प्रत्यक्ष सहभागी झाले होते.

रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर होणार तडीपार

मागील ५ वर्षांत जातीय गुन्हे, शरीराविरुद्धचे गुन्हे, अंमली पदार्थ तस्करी करणारे आणि रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कडक प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अशा समाजकंटकांकडून चांगल्या वर्तणुकीचा बाँड लिहून घेतला जात असून, उत्सव काळात त्यांना अहिल्‍यानगर शहर हद्दपार (तडीपार) करण्यात येणार असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

सण आणि उत्‍सव दिनांक

  • २६ ऑगस्ट: ईद-ए-मिलाद

  • २७ ऑगस्ट: नारळी पौर्णिमा

  • २८ ऑगस्ट: रक्षाबंधन

  • ४ सप्टेंबर: श्रीकृष्ण जयंती

  • ५ सप्टेंबर: गोपाळकाला व दहीहंडी

  • ६ सप्टेंबर: वीर गोगादेव उत्सव मिरवणूक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT