नगर: पावसात गळणारे छप्पर, उन्हात तापणाऱ्या भिंती अन् यामुळेच स्वतःच्या घराची वर्षानुवर्षे पाहिलेली स्वप्ने आता पूर्ण होताना दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'सर्वांसाठी घर' या संकल्पनेला नगर जिल्ह्यात वेग आला आहे. या वर्षी १ लाख २४ हजार घरे मंजूर असून, कालअखेर २६ हजार ४७० कुटुंबांनी नव्या घरात प्रवेशही केला आहे. गत महिन्यात सहा हजार घरे पूर्ण करून प्रशासनाने उर्वरित कुटुंबांची घराची स्वप्नेही वर्षभरात साकारसाठी मायक्रो प्लॅन तयार केल्याचे चित्र आहे.
घर हे प्रत्येक कुटुंबाचे सर्वात मोठे स्वप्न असते. आयुष्यभर काबाड कष्ट करूनही अनेक गरीब कुटुंबांना हक्काचे पक्के घर मिळत नव्हते. मात्र प्रधानमंत्री आवास योजनेमुळे हजारो कुटुंबांच्या आयुष्यात आशेचा नवा किरण दिसत आहे.
जिल्ह्यात जानेवारी आणि जून २०२५ या कालावधीत सुमारे १ लाख २४ हजार घरकुले मंजूर झाली. त्यापैकी जुलै २०२६ अखेर २६ हजार ४७० घरे पूर्ण झाली असून ९७ हजार ५३२ घरांची कामेही वेगात सुरू आहेत.
लाभार्थ्यांची घरे वेळेत पूर्ण व्हावीत, यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प संचालक मंजुषा ठेवकर, सहाय्यक अभियंता किरण साळवे तसेच त्यांची सर्व तालुक्यांतील अभियंत्यांची टीम प्रयत्न करत आहे.
याशिवाय, तालुकास्तरावर गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक यांच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या अडचणी सोडविण्याचे काम सुरू आहे. दरमहा सरासरी सहा हजार घरे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. ३० जुलैअखेर ५ हजार ५२९ घरे पूर्ण झाली. म्हणजेच दररोज सुमारे ३४५ घरकुलांचे काम पूर्ण करण्याच्या वेगाने प्रशासनाने काम केले. आता ऑगस्टचे टार्गेटपूर्ती केली जात आहे. घरकुल लाभार्थ्याला सुमारे २ लाख १० हजार रुपयांपर्यंतची मदत दिली जाते.
घरकुलासाठी नेमका निधी किती?
घरकुल बांधकामासाठी १,२०,०००
पूरक अनुदान – ५०,०००
मनरेगा अंतर्गत मजुरी २८,०००
वैयक्तिक शौचालयासाठी १२,०००
सौरऊर्जा (सोलर) प्रणाली मोफत
हप्त्यांचे टप्पे
- पहिला हप्ता – १५,०००
- दुसरा हप्ता – ७०,०००
- तिसरा हप्ता – ३०,०००
- अंतिम हप्ता – ५,००० (नियमांनुसार)
मंजूर घरकुलांची कामे सुरू आहेत. जागेच्या अडचणीबाबतही प्रशासन म्हणून आम्ही सहकार्य करतो. लाभार्थ्यांपर्यंत निधीही वेळेत कसा पोहचेल, यासाठी तत्पर असतो. आपण दर महिन्याला सहा हजार घरे पूर्ण करण्याचे नियोजन हाती घेतले असून, त्या दृष्टीने आमची यंत्रणा ग्राऊंडवर पाठपुरावा करत आहेत. लाभार्थ्यांचा चांगला प्रतिसाद आहे.मंजूषा ठवकर, प्रकल्प संचालक