Ahilyanagar Open Science Park Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar Open Science Park: अहिल्यनगर ‘ओपन सायन्स पार्क’ योजना अडथळ्यात; निधी इतर कामांसाठी वापरला

शालेय विद्यार्थ्यांसाठी राखीव 50 लाखांचा निधी गुंडाळला; प्रशासनाची उदासीनता आणि ग्रामपंचायतींचा निरुत्साह

पुढारी वृत्तसेवा

नगर: शालेय शिक्षणासोबत विद्यार्थ्यांना विज्ञानाची, संशोधनाची आवड निर्माण व्हावी, यासाठी जिल्हा परिषदेच्या सेसमधून घेतलेली ‌‘ओपन सायन्स पार्क‌’ ही नावीन्यपूर्ण योजना प्रशासनाची उदासीनता आणि स्थानिक ग्रामपंचायत, शिक्षण व्यवस्थेच्या निरुत्साहामुळे गुंडाळण्याची नामुष्की ओढवली आहे. त्यामुळे सेसमधून केलेली 50 लाखांची तरतूद बांधकाम, सादिल खर्चासाठी वळविण्यात आल्याचे दिसले.

जिल्हा परिषदेच्या सेसच्या निधीतून दोन वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर आणि कॅफो शैलेश मोरे यांनी अर्थसंकल्प सादर केला होता. यामध्ये ‌‘ओपन सायन्स पार्क‌’ ही नावीन्यपूर्ण योजना घेतली होती. पहिल्या टप्प्यात पाच सायन्स पार्क मंजूर केले. या योजनेचे जिल्हाभर मोठे कौतुक झाले होते. प्रत्येक तालुक्यात एक असे 14 सायन्स पार्क उभारण्याचा मानस होता.

नेमकी काय होती योजना

शालेय विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढावा, यासाठी ओपन सायन्स पार्क ही संकल्पना पुढे आली. जिल्हा परिषदेच्या सेसमधून एका सायन्स पार्कच्या उभारणीसाठी 10 लाख आणि स्थानिक ग्रामपंचायतींच्या निधीतून 10 लाख अशाप्रकारे 20 लाखांत ही योजना राबविली जात आहे. पहिल्याच वर्षी म्हणजे 2023-24 च्या बजेटमधून संवत्सर (कोपरगाव), सारोळा कासार (नगर), पानोली (पारनेर), काष्टी (श्रीगोंदा) आणि कोळगाव (श्रीगोंदा), येथे ओपन सायन्स पार्क उभे राहिले. त्यानंतर 2024-25 मध्ये पुन्हा 50 लाखांची तरतूद करण्यात आली होती. मात्र वर्षभरात एकही सायन्स पार्क उभे राहिले नाही.

निधी पळवला कोठे?

ओपन सायन्स पार्क विकसित करण्यासाठी ठेवलेल्या 50 लाखांपैकी 40 लाखांचा निधी हा दि.25 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत ठराव क्रमांक 361 तसेच दि.26 ऑक्टोबर 2025 रोजी झालेल्या बैठकीतील ठराव क्रमांक 393 नुसार कमी करण्यात आला. योजनेवर ठेवलेला उर्वरित 10 लाखांचा निधीदेखील गेल्या वर्षीच्या दायित्वासाठी असल्याचे सांगितले जाते.

प्रशासनाची उदासीनता की अन्य काही?

ओपन सायन्स पार्क ही योजना चांगली होती. प्रतिसादही चांगला होता. गतवर्षात एकही पार्क उभे राहिलेले नाही. कारण त्यासाठी सेसमधून निधीच दिलेला नाही. आता हा निधी का दिला नाही, तो कुठे वळवला, का वळवला, याची उत्तरे कॅफोंनाच विचारा, असे एका जबाबदार कर्मचाऱ्याने सांगितले. दुसरीकडे या योजनेसाठी ग्रामपंचायत 10 लाख रुपये देण्यासाठी उत्सुक नव्हती, त्यामुळे प्रस्तावच आले नाही, असेही सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT