नगर: राज्यातील ग्रामीण व दुर्गम भागात आरोग्यसेवा पोहोचवणाऱ्या राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अंतर्गत कार्यरत समुदाय आरोग्य अधिकारी व इतर कंत्राटी अधिकारी व कर्मचारी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. गेल्या चार महिन्यांपासून त्याचे वेतन रखडले आहे. त्यामुळे अनेक समुदाय आरोग्य अधिकारी आर्थिक कोंडीत सापडला आहेत.
समुदाय आरोग्य अधिकारी हे उपकेंद्र पातळीवर कार्यरत राहून माझं गाव, आरोग्य संपन्न गाव, टीबी मुक्त भारत, सिकलसेल प्रतिबंध, पॅलिएटिव्ह केअर, तसेच उच्च रक्तदाब व मधुमेह नियंत्रण यांसारख्या विविध महत्त्वपूर्ण आरोग्य योजनांची अंमलबजावणी करीत आहेत. अत्यंत मर्यादित साधनसामग्री, अपुरे मनुष्यबळ व गेल्या दोन वर्षांपासून अबंधित निधी नसतानाही ते सातत्याने सेवा देत आहेत. मात्र, सध्यस्थितीत राज्यभरातील समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचा सरासरी 5 महिन्यांचा कामावर आधारित मोबदला व जवळपास दोन महिन्यांचा नियमित पगार प्रलंबित आहे. या वेतनविलंबामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर मोठा आर्थिक ताण निर्माण झाला आहे.
समुदाय आरोग्य अधिकारी संवर्गाचे मानधन हे निश्चित व कामावर आधारित मोबदला अशा दोन भागांमध्ये विभागलेले आहे. त्यामुळे कामावर आधारित मोबदला हा नेहमीच विलंबित राहतो. गेल्या सहा वर्षांपासून यासंदर्भात सातत्याने पाठपुरावा करूनही अद्याप कोणताही कायमस्वरूपी तोडगा निघालेला नाही. या आर्थिक अनिश्चिततेमुळे समुदाय आरोग्य अधिकारी गंभीर विवंचनेत सापडले आहेत. घर खर्च, मुलांचे शिक्षण, कर्जाचे हप्ते यांचा कसे भरायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे.
ही आर्थिक अडचणीची परिस्थिती केवळ समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांपुरती मर्यादित नसून ् अंतर्गत कार्यरत इतर कंत्राटी अधिकारी व कर्मचारी-जसे की कंत्राटी वैद्यकीय अधिकारी, आरोग्यसेविका, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, डेटा एंट्री ऑपरेटर, कुष्ठरोग तंत्रज्ञ व आरोग्यसेवेतील समुपदेशकांनाही वेतन विलंबाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ प्रलंबित वेतन व समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचा कामावर आधारित मोबदला अदा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
आरोग्य विभागाकडून वेगवेगळे राष्ट्रीय कार्यक्रम राबविले जात आहेत. त्यात समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून ते मानधनापासून वंचित आहेत. त्यामुळे असंख्य आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शासनाकडून पाठपुरवा केला असता वेगवेगळे पोर्टलची नावे सांगून दिशाभूल करणारे उत्तर मिळत आहे.बाळासाहेब यादव, जिल्हा उपाध्यक्ष, समुदाय आरोग्य अधिकारी संघटना