नगर: अहिल्यानगर शहरासह जिल्हाभरात शारदीय नवरात्रोत्सव जोमात सुरु आहे. दुष्काळाचे सावट असले तरी केडगाव व बुर्हाणनगरला आई अंबेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळत आहे.
मंदिरांबरोबरच बाजारपेठा, पूजा साहित्या, खेळणी दुकाने तसेच चहापाणी, फराळासाठी छोट्या - मोठ्या हॉटेलांत भाविकांची गर्दी होत आहे. दुष्काळी परिस्थितीतही नवरात्रोत्सवात कोट्यवधींची उलाढाल सुरु आहे.
रविवारी (दि.११) घटस्थापना झाल्यानंतर नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला. पहिल्या माळेपासूनच पाथर्डी येथील मोहटादेवी मंदिरात दर्शनासाठी गर्दी झाली. बाहेरगावांहून येणार्यांची संख्या अधिक आहे.
अहिल्यानगर शहराजवळील तुळजापूरच्या भवानी मातेचे माहेरघर मानल्या जाणाऱ्या बुऱ्हाणनगर येथील प्रसिध्द तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी उसळली. दर्शन घेण्यासाठी दीड दोन तास लागत असून, विविध धार्मिक विधी, महाआरती आणि पलंग-पालखी आदी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
आणखी चार दिवस राहणार गर्दी
केडगाव येथील रेणुकामाता कोल्हार बुद्रूक येथील भगवतीमाता, राशीन येथील जगदंबामाता आदींसह अहिल्यानगर शहर आणि ग्रामीण भागांतील देवींची मंदिरे पहाटेपासून भाविकांनी गजबजून जात आहेत. पाचव्या माळेला गुरुवारी (दि.१५) मोहटा येथे जिल्हाभरातून भाविक आले होते. केडगाव आणि बुर्हाणनगर येथे पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या.
जिल्हाभरातील जवळपास सर्वच मंदिरांत दर्शनासाठी गर्दी उसळली आहे. आणखी चार दिवस अशीच गर्दी असणार आहे. यंदा खरीप हंगाम हातचा गेला, तरीही आई जगदंबेचा धावा करण्यात कुठे भाविकांचा दुष्काळ जाणवला नाही. नवरात्रोत्सवात दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे गेल्या पाच दिवसांपासून जिल्हाभरात भक्तीचा महापूर वाहत आहे.
कोट्यवधींची उलाढाल
नवरात्रोत्सवानिमित्त मंदिर परिसरात पूजा साहित्य, नारळ, फुले, खेळणी, खाद्यपदार्थांची दुकाने तसेच लहान मुलांसाठीचे रहाट पाळणे आदींसह विविध मनोरंजनात्मक साधनांची दुकाने थाटली गेली आहेत.
खासगी वाहने करुन देवींच्या दर्शनासाठी येणार्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे ऐन दुष्काळी परिस्थितीतही नवरात्रोत्सवानिमित्त बाजारात पैशांची देवाणघेवाण वाढली असून, कोट्यवधींची उलाढाल होत आहे.