नगर : लोकप्रतिनिधी व ठेकेदारांनी अहिल्यानगर महापालिका लुटून खाल्ल्याचा घणाघाती आरोप शिवसेना उद्ध्व बाळासाहेब ठाकरे पक्षाचे (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी केला आहे. 776 रस्त्यांच्या कामातील सुमारे 350 ते 400 कोटींहून अधिक रकमेच्या स्कॅमला राजकीय संरक्षण मिळत आहे. जनतेच्या व्यापक हितासाठी या भ्रष्टाचाराची दखल घेत तत्काळ सर्व दोषींवर उपलब्ध चौकशी अहवालाच्या आधारे कारवाई करावी, अशी मागणी खा. राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
खासदार राऊत यांनी पत्रात म्हटले आहे, की महापालिकेतील भ्रष्ट अधिकारी, ठेकेदारांच्या गँगने महायुती सरकारच्या वरदहस्ताने संगनमत करत 2016 ते 2020 या चार वर्षांच्या कालावधीत 776 रस्त्यांच्या सुमारे 350 ते 400 कोटींहून अधिक रकमेचा महाघोटाळा केला आहे. अहिल्यानगरमधील सर्वांत मोठा स्कॅम सरकारला समर्थन देत असल्याने लोकांमुळे दडपला जात आहे. उबाठाचे शहरप्रमुख किरण काळे यांनी पुराव्यानिशी घोटाळा उघड केला आहे. 8 मे 2023 रोजी पहिली तक्रार महापालिका आयुक्तांसह जिल्हा पोलिस अधीक्षक, तसेच महायुती सरकारमधील पालकमंत्र्यांकडेही केली होती.
नगरविकास विभाग, गृह विभाग तसेच या कामांची बिले अदा करण्यापूर्वी गुणवत्ता प्रमाणपत्र शासकीय तंत्रनिकेतन संस्थेकडून दिले जाते, त्यांच्याकडेही वारंवार लेखी पाठपुरावा केला. त्यानंतर शासकीय तंत्रनिकेतन संस्थेने 16 जून 2023 रोजी पाच सदस्यांची समिती स्थापन करत कागदपत्रे, पुराव्यांची पडताळणी केली. त्यात 776 रस्त्यांच्या कामांची शेकडो कोटींची बिले लाटण्यासाठी ठेकेदारांनी तंत्रनिकेतनच्या अधिकर्यांना हाताशी धरून संगनमताने बनावट लेटरहेड, बनावट शिक्के, राजपत्रित असणार्या अधिकार्यांच्या नावांचे बनावट शिक्के, त्यांचा खोट्या सह्या करून हा महाघोटाळा केला असल्याचा आरोपही खा. राऊत यांनी पत्रात केला आहे.
कोणताही घोटाळा नाही : आयुक्त यशवंत डांगे
महापालिकेत सुमारे 776 रस्त्यांच्या कामात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याच्या बातम्या सोशल मीडियात दाखवल्या जात आहेत. असा कोणताही घोटाळा महापालिकेत झालेला नाही. अशी तक्रार माझ्यापर्यंत आलेली नाही, असे महापालिका आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी स्पष्ट केले आहे.
शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या नावाचा बनावट टेस्ट रिपोर्ट केल्याचा आरोप आहे, त्याबाबतही तक्रार पाहण्यात आलेली नाही. मात्र, बनावट टेस्ट रिपोर्ट म्हणजे त्याचा अर्थ काम झालेच नाही, असा होत नाही, असे सांगत रस्त्याच्या कामांमध्ये कोणताही घोटाळा, अपहार झालेला नसल्याचे आयुक्त डांगे यांनी म्हटले आहे.
बनावट टेस्ट रिपोर्टच्या माध्यमातून महापालिकेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याच्या चर्चा सुरू आहेत. लोकप्रतिनिधी, तत्कालीन महापौर व पदाधिकार्यांनी हा घोटाळा केल्याचे आरोप होत आहेत. याबाबत आता महापालिकेने खुलासा केला आहे. काम न करता खोटी बिले काढल्याचा, असा कोणताही घोटाळा झालेला नाही. महापालिका केलेल्या कामांची देयके अदा करण्यापूर्वी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाकडून टेस्ट रिपोर्ट करून घेते. ही प्रशासकीय प्रक्रिया आहे. महाविद्यालयाचे टेस्ट रिपोर्ट बनावट असल्याबाबत महापालिकेकडे अधिकृत माहिती उपलब्ध नाही. त्याची तक्रारही माझ्याकडे आलेली नाही. तक्रार आल्यास याबाबत पडताळणी केली जाईल. मात्र, रिपोर्ट बनावट असले तरी रस्त्याचे काम झालेले नाही, काम न करताच बिल अदा झाले, असा कोणताही घोटाळा झालेला नसल्याचे आयुक्त डांगे यांनी स्पष्ट केले.
महापालिकेचे कामकाज महाराष्ट्र महानगरपालिका कायद्यानुसार चालते. शहरातील जनतेने जे लोकप्रतिनिधी निवडून दिलेले आहेत, त्यांनी नागरिकांच्या तक्रारी, मागण्याबाबत केलेल्या सूचना महापालिकेला विचारात घ्याव्या लागतात, असेही आयुक्त यशवंत डांगे यांनी स्पष्ट केले आहे.