डॉ. सूर्यकांत वरकड
नगर: अहिल्यानगर महापालिकेत साधारण दीड वर्षापूर्वी शासनाने पदभरतीस मान्यता दिली. त्यानंतर पदांची संख्या कमी करण्यात आली. अभियंता, पर्यवेक्षक, लिपिक असा 45 पदांना अखेर मान्यता मिळाली. त्यासाठी भरती प्रक्रिया राबविण्यासाठी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीची निवड करण्यात आली.
दरम्यान, महापालिकेची निवडणूक लागल्याने पदभरती लांबली होती. निवडणुकीनंतर मनपाकडून टीसीएसकडे पत्रव्यवहार सुरू आहे. मात्र, टीसीएसकडून अद्यापि पुढील प्रक्रिया कळविण्यात आली नसल्याचे सूत्रांकडून समजले.
महापालिकेत गेल्या 18 वर्षांपासून भरती प्रक्रिया राबविण्यात आलेली नाही. दरवर्षी कर्मचारी सेवानिवृत्त होत असून, बांधकाम, पाणीपुरवठा, विद्युत, अग्निशमन अशा विविध विभागात कर्मचाऱ्यांची वानवा आहे.
अनेक विभागात बाह्यसंस्थेमार्फत कर्मचाऱ्यांची नेमणूक करून कामकाज चालविले जात आहे. लोकप्रतिनिंधीकडून पदभरतीची मागणी होत होती. मात्र, मनपाचा आस्थापना खर्च एकूण उत्पन्नाच्या 35 टक्के पुढे जात असल्याने नगरविकास विभागाकडून पदभरतीस मान्यता मिळत नव्हती.
दुसरीकडे विविध अभियंते, विद्युत पर्यवेक्षक अशा तांत्रिक कर्मचाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होऊन कामकाजात अडथळे निर्माण झाले होते. त्यामुळे महानगरपालिकेने तांत्रिक पदांच्या भरतीसाठी आस्थापना खर्चाची अट शिथिल करून परवानगी द्यावी, असा प्रस्ताव नगर विकास खात्याकडे पाठवला होता. त्याला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी देत 176 पदे भरण्याचा प्रस्ताव मंजूर केला.
दरम्यानच्या काळात सातवा वेतन आयोग लागू झाल्यामुळे महानगरपालिकेच्या आस्थापना खर्चात पुन्हा एकदा वाढ झाली. त्यामुळे कामकाजातील अडथळा दूर करण्यासाठी अत्यावश्यक असलेली 45 तांत्रिक पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला.
बिंदू नामवलीसह समांतर आरक्षण निश्चित करून पद भरती प्रक्रिया सुरू करण्यासाठी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आणि त्यांच्याशी करारनामाही केला आहे. दरम्यान, महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम लागला. त्यामुळे पदभरती प्रक्रिया लांबणीवर गेली.
निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर महापालिकेने टीसीएसकडे अनेक वेळा पत्र व्यवहार केला. त्यात टीसीएसने जाहिरातीचा मसुदा आणि अन्य प्रक्रियेसंदर्भात सूचना केल्या आहेत. परंतु, त्या पुढील प्रक्रियेची माहिती टीसीएसकडून अद्यापि कळविण्यात आलेली नाही. महापालिकेकडून टीसीएसकडे पत्रव्यवहार सुरू असल्याचे समजते. त्यामुळे तांत्रिक विलंबामुळे पुन्हा एकदा महापालिका पदभरती प्रक्रिया रेंगाळल्याचे दिसून येते. महापालिकेत पदभरती झाल्यास कामामध्ये सुसूत्रता येणार आहे तर, कामकाजातील तांत्रिक अडथळे दूर होणार आहेत.
या पदांची होणार भरती
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 15
कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) 3
कनिष्ठ अभियंता (ऑटोमोबाईल) 1
अभियांत्रिकी सहाय्यक 8
विद्युत पर्यवेक्षक 3
लिपीक टंकलेखक 13
संगणक प्रोग्रॅमर 1
पशुधन पर्यवेक्षक 1