नगर: अहिल्यानगर महानगरपालिका कर्मचाऱ्यांचे फेब्रुवारी व मार्च महिना संपत आला तरी पगार न झाल्यामुळे कर्मचारी संतप्त झाले असून महानगरपालिका कामगार युनियनच्या वतीने कामबंद आंदोलन सुरू करण्याता अले. मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन करीत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.
पगार रखडल्यामुळे कर्मचाऱ्यांवर मोठा आर्थिक ताण निर्माण झाला आहे. कर्जाचे हप्ते, मुलांच्या शाळेची फी, तसेच आजारपणाचे खर्च भागवणे कठीण झाले असून अनेक कर्मचारी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यावेळी कामगार युनियनचे अध्यक्ष बाबासाहेब मुदगल म्हणाले, फेब्रुवारी महिना संपून मार्चही संपत आला तरी कर्मचाऱ्यांना पगार मिळालेला नाही. त्यामुळे कर्मचारी अत्यंत कठीण परिस्थितीत आहेत. जोपर्यंत प्रशासनाकडून पगाराबाबत ठोस आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत कर्मचारी कामकाज सुरू करणार नाहीत. प्रशासनाने तात्काळ यावर तोडगा काढावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
महानगरपालिकेतील पगारप्रश्न गंभीर बनला असून, यामुळे प्रशासन व कर्मचाऱ्यांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रश्नावर तातडीने तोडगा निघणे गरजेचे असल्याची भावना कर्मचारी व्यक्त करीत आहे.
मार्च महिना संपत आला तरी महापालिका कर्मचाऱ्यांना पगार मिळालेला नाही. प्रशासनाने वेळेत पगार न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल.बाबासाहेब मुदगल, अध्यक्ष, कामगार युनियन