

नगर: जिल्हा प्रशासनाने 30 लाख लिटरची मागणी केलेली असताना जिल्ह्यासाठी फक्त 2 लाख 16 हजार लिटरचे नियतन मंजूर झाले. मात्र, सध्यस्थितीत केरोसीन वितरण व्यवस्था अस्तित्वात नाही. ती कार्यान्वित करण्यासाठी पंधरा ते वीस दिवसांचा अवधी लागणार आहे. तोपर्यत जनतेची परवड सुरुच राहाणार अशी परिस्थिती आहे.
गेल्या 25 दिवसांपासून युध्दजन्य परिस्थितीची झळ गोरगरिब जनतेला बसली आहे. सहज मिळणारे घरगुती सिलिंडर आता मिळेनासे झाले आहे. खबरदारी म्हणून शासनाने केरोसीन उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला. प्रत्येक कुटुंबाला पाच लिटरनुसार जिल्हा प्रशासनाने 30 लाख लिटरची मागणी केली होती.
मात्र, शासनाने फक्त 2 लाख 16 हजार लिटर नियतन मंजूर केले. सध्या जिल्हाभरात दहा लाख रेशनकार्डधारक आहेत. त्यामुळे केरोसीनचीदेखील टंचाई भासणार आहे. शासनाने फक्त नियतन मंजूर केले असून, प्रत्येक कुटुंबाला तीन लिटर वाटप केले जाणार आहे. केरोसीन वितरण करण्यासाठी पूर्वीच्या केरोसीन वितरकांचे परवाना नूतनीकरण करणे, वाहतूक आदी प्रक्रिया बाकी आहे. या प्रक्रियेसाठी पंधरा ते वीस दिवसांचा अवधी लागणार आहे. त्यामुळे तत्काळ केरोसीन उपलब्ध होणे सध्यातरी अवघड झाले आहे.