नगर: अहिल्यानगर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होत असून, मतदान प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. शहरातील 70 शाळांमध्ये 345 मतदान केंद्र आहेत. त्यात एक पिंक व दोन मॉडेल मतदान केंद्र असणार आहेत. नागरिकांनी निर्भयपणे राष्ट्रीय कर्तव्य म्हणजेच मतदान करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त तथा मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी यशवंत डांगे यांनी केले.
अहिल्यानगर महापालिकेत तब्बल दोन वर्षांच्या प्रशासकराज त्यानंतर आता कार्यकारी मंडळासाठी 15 जानेवारी रोजी मतदान होत आहे. प्रशासनाने मतदान प्रक्रियेची जोरदार तयारी केली आहे. शहरातील 345 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. त्यासाठी सुमारे 2200 कर्मचारी तैनात करण्यात आले असून, सुमारे दोन हजार पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मतदान केंद्रावर केंद्रावर आरोग्य पथक, महावितरणचे एक कर्मचारी, ज्येष्ठ नागरिकांसाठी व्हीलचेअरची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, रात्री विजेची व्यवस्था, मतदान केंद्रावरती सर्वत्र सीसीटीव्हीची व्यवस्था करण्यात आली. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी नागरिकांनी कोणाच्याही दबावाला बळी न पडता मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन आयुक्त डांगे यांनी केले.
दरम्यान, महापालिका हद्दीतील काही मतदान केंद्रावर अनुचित प्रकार घडू नये म्हणून सात मतदान केंद्रावर निवडणूक प्रशासनाचे विशेष लक्ष राहणार आहे. त्यासाठी सर्व प्रकारच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
या मतदान केंद्रांवर विशेष लक्ष
जिल्हा परिषद उर्दू शाळा दर्गा दायरा मुकुंदनगर
मौलाना आझाद उर्दू शाळा मुकुंदनगर
पेमराज सारडा कॉलेज पत्रकार चौक
राधाबाई काळे महाविद्यालय तारकपूर
मनपा उर्दू व मराठी शाळा बेलदारगल्ली
नागोरी मिसगर उर्दू प्राथमिक शाळा बेलदार गल्ली
सीताराम सारडा शाळा, बागडपट्टी
मतदान केंद्रांवरील सुविधा
आरोग्य कर्मचाऱ्यांचे पथक
महावितरणच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती
ज्येष्ठ नागरिकांसाठी व्हीलचेअर
प्रत्येक मतदान केंद्रावर विजेचे चार फोकस
पिण्याच्या पाण्याची व्यवस्था
मतदारांच्या सहाय्यतेसाठी स्वयंसेवक
दोन हजार पोलिसांचा बंदोबस्त
अप्पर पोलिस अधीक्षक 1
पोलिस उपअधीक्षक 5
पोलिस निरीक्षक 6
एपीआय/पीएसआय 118
प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षक 15
पोलिस अंमलदार 1,066
एसआरपीएफ कंपनी 1
दंगा नियंत्रण पथक (आरसीपी) 2
स्ट्रायकिंग फोर्स पथक 5, होमगार्ड 650
ईव्हीएमसाठी 80 बस
अहिल्यानगर महापालिकेच्या सहा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयातून उद्या ईव्हीएम मशिन व साहित्याचे वाटप होणार आहे. त्यासाठी 80 बसची व्यवस्था करण्यात आली आहे.
मोबाईल वापरास बंदी
मतदान केंद्रावर मोबाईल नेण्यास बंदी आहे. तशा सूचना निवडणूक प्रशासनाने दिल्या आहेत. मतदान केंद्रावर मोबाईल येणाऱ्यावर कायदेशीर कडक कारवाई केली जाणार आहे.
कर्मचाऱ्यांची भोजन व्यवस्था
मतदान केंद्रावर नियुक्त कर्मचाऱ्यांना जेवण, नाष्टा व राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांची कोणत्याही प्रकार गैरसोय होणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे.