नगर: अहिल्यानगर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 17 प्रभागांतील 66 जागांवरील अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी तब्बल 194 जणांनी माघार घेतली. त्यामुळे आता निवडणुकीच्या रिंगणात 283 उमेदवार जण उरले असून, आज चिन्हवाटप होणार आहे. त्यानंतर खुल्या प्रचारास सुरुवात होणार आहे. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी अनेकांनी नाट्यमयरित्या माघार घेतली.
अहिल्यानगर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, आम आदमी पार्टी, एमआयएम, वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पार्टी, एकलव्य बहुजन विकास पार्टीसह अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अर्ज छाननीत 788 पैकी 17 अर्ज बाद झाले होते. एकाच प्रभागातील दोन ते तीन अर्ज भरले होते, त्यातील प्रथम अर्ज ग्राह्य धरल्याने पहिल्या दिवशी 17 प्रभागांतील 68 जागांसाठी 477 इच्छुक उमेदवार रिंगणात राहिले होते. अर्ज माघारीच्या दुसऱ्या दिवशी नाट्यमय घडामोडी घडल्या. 477 पैकी सुमारे 194 जणांनी माघार घेतली. त्यात एकूण पाच जणांची बिनविरोध निवड झाल्याने अखेर 283 जण निवडणुकीच्या मैदानात राहिले. त्यात अनेक दिग्गजांचा समावेश आहे. आज शनिवारी (दि. 3) निवडणुकीच्या मैदानातील उमेदवारांना चिन्हाचे वाटप होणार आहे.
त्यांनी लढण्याआधीच ठेवले शस्त्र
महापालिका निवडणुकीत अर्ज छाननी प्रक्रियेत शिवसेना शिंदे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने एकप्रकारे शिवसेना शिंदे गटाला ग्रहण लागले होते. आज अर्ज माघारीच्या दुसऱ्या दिवशी प्रभाग 7 मध्ये शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार श्रद्धा रवी वाकळे यांनी माघार घेतली. प्रभाग 6 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सविता विवेक गायकवाड यांनी माघार घेतली.
कार्यकर्त्यांचा जल्लोष
प्रभाग क्रमांक सहामधून करण उदय कराळे व सोनाबाई तायगा शिंदे हे बिनविरोध झाल्याने कार्यकर्त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयासमोरच जल्लोष केला व घोषणाबाजी केली.
मनधरणीत अन् विनवण्या
अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेकजण इच्छुक उमेदवारांच्या मनधरणीत गुंतले होते. गेल्या दोन दिवसांपासून आपल्या विरोधात उमेदवारच नको, असा हेका कायम ठेवत पक्षाच्या अधिकृत उमेदवारांनी अपक्ष व अन्य पक्षांच्या उमेदवारांच्या संपर्कात राहून त्यांना अर्ज माघारी घेण्याची विनवणी करीत होते.
...काय आहे त्यांची डिमांड
अपक्ष आणि अन्य पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज माघारी घ्यावेत, यासाठी बड्या नेत्यांच्या हस्तकांनी सावेडी तहसील परिसरातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर सकाळपासूनच ठाण मांडले होते. उमेदवारांसह अन्य लोकांना फोनाफोनी सुरू होती. काय करायचे ते करा पण त्यांनी अर्ज मागे घेतला पाहिजे. त्यांची काय डिमांड आहे ती पूर्ण करा, असे ते मध्यस्थी कार्यकर्त्यांना सुचवत होते.
कार्यकर्त्यांची मोठी गर्दी
अर्ज माघारीच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन उमेदवार बिनविरोध झाले. त्यामुळे अहिल्यानगर शहरात जणू काय बिनविरोधचा ट्रेंड आला की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. अधिकृत पक्षाच्या प्रत्येक उमेदवाराला आपण बिनविरोध व्हावे, असे वाटत होते. त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू होते. नेमके कोण माघार घेते आणि कोण बिनविरोध होतो हे पाहण्यासाठी कार्यकर्त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर गर्दी केली होती.
अनेकांना टाकला गळ
अर्ज छाननीनंतर आपल्या विरोधात प्रबळ उमेदवार राहूनही यासाठी इच्छुक उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी विरोधी उमेदवारांना गळ टाकण्याचे काम सुरू केले होते. अनेक अपक्ष या कार्यकर्त्यांच्या गळाला लागले, मात्र काही इच्छुक उमेदवार त्यांच्या गळाला लागले नाही.
सावेडीचा ड्रामा अन् माजी नगरसेवकांची यशस्वी मध्यस्थी
प्रभाग क्रमांक 6 ब मधून दोन भाजपचे उमेदवार बिनविरोध झाले हे उमेदवार बिनविरोध करण्यामागे भाजपाचा एका माजी नगरसेवकाचा आणि भाजपाच्या निष्ठावंत पदाधिकाऱ्याचा हात असल्याची बोलले जाते. भाजपचे माजी नगरसेवक गेल्या दिवसांपासून अपक्ष व अन्य पक्षांच्या उमेदवाराच्या संपर्कात होते. त्यांच्याशी चर्चा करीत होते. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी त्यांना अनेकांचे उमेदवारी अर्ज मागे घेण्यात यश आले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार सावेडीतील माजी आमदारांच्या घरी बसल्याची माहिती मिळाली. शेवटच्या टप्प्यात वरिष्ठ नेत्यांच्या यंत्रणेचा फोन झाल्यानंतर त्या माजी नगरसेवकांनी थेट सावेडीतील माजी आमदाराच्या घरी बसलेल्या उमेदवाराला गाठले. त्याला घेऊन आले व शेवटच्या 20 मिनिटांत अर्ज मागे घेतला.