नगर: अहिल्यानगर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसअखेर इच्छुकांनी 788 उमेदवारी अर्ज भरले. त्यात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस, एमआयएम, आम आदमी, बसपा पक्षाच्या इच्छुकांनी उमेदवारी अर्ज भरले.
महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारपासून उमेदवारी अर्ज विक्री व भरण्यास प्रारंभ झाला होता. 17 प्रभागातील इच्छुकांसाठी सहा ठिकाणी अर्ज भरण्याची व अर्ज खरेदी करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आज शेवटच्या दिवशी अर्ज भरण्यासाठी इच्छुकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी होती.
सावेडी उपनगरातील तहसील कार्यालय, सावित्रीबाई व्यापारी संकुलाला जत्रेचे स्वरूप आले होते. तर, बुरूडगाव, जुनी महापालिका, केडगाव येथेही इच्छुकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. इच्छुक उमेदवारांनी वाजत गाजात मिरवणुका काढल्या. अनेकांनी निवडणूक अर्ज भरण्यासाठी आलेल्यानंतर दुसऱ्या पक्षात प्रवेश केला.
17 प्रभागांसाठी इच्छुकांनी सुमारे 788 उमेदवारी अर्ज दाखल केले. उद्या (दि. 31) रोजी छाननी होणार असून 2 जानेवारी 2026 पर्यंत अर्ज माघार घेता येणार आहे. अर्ज माघारीनंतर निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट होईल.
निवडणूक कार्यालय भरलेले अर्ज
तहसील कार्यालय सावेडी 129
प्रभाग समिती एक सावेडी 142
भूसंपादन कार्यालय सावेडी 79
जुने मनपा कार्यालय 169
प्रभाग समिती 4, बुरूडगाव 127
केडगाव उपकार्यालय 142