नगर : राज्य निवडणूक आयोगाने नगरपालिका आणि नगरपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला असून, आजपासूनच नगरपालिका परिसरात आचारसंहिता लागू झाली आहे. 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान होणार असून, 3 डिसेबर रोजी मतमोजणी होणार आहे. नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर, संगमनेर, कोपरगाव, राहाता, शिर्डी, राहुरी, देवळाली प्रवरा, शेवगाव, पाथर्डी, श्रीगोंदा व जामखेड या अकरा नगरपालिका आणि नेवासा नगरपंचायत अशा बारा पालिकांचा समावेश आहे.(Latest Ahilyanagar News)
जिल्ह्यातील या पालिकांच्या निवडणुका गेल्या तीन साडेतीन वर्षांपासून रखडल्या होत्या. न्यायालयाच्या आदेशानंतर गेल्या तीन महिन्यांपासून या निवडणुकांची पूर्वतयारी सुरू होती. प्रभागरचना, आरक्षण सोडत आणि मतदारयाद्यांचा कार्यक्रम पूर्ण होताच मंगळवारी (दि.4) नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच विविध राजकीय पक्षांतील इच्छुक कार्यकर्त्यांची धावपळ सुरू झाली आहे. जिल्ह्यातील अकरा पालिका आणि एका नगरपंचायतींच्या एकूण 289 नगरसेवकपदांसाठी निवडणूक होणार आहे. 4 लाख 51 हजार 287 मतदार ही निवड करतील.
श्रीरामपूर : 34 (80992)
संगमनेर : 30 (57714)
कोपरगाव : 30 (63453)
राहुरी : 24 (33269)
देवळाली प्रवरा : 21 (23861)
जामखेड : 24 (33161)
पाथर्डी : 20 (23242)
राहाता : 20 (19465)
शेवगाव : 24 (35479)
शिर्डी : 23 (33613)
श्रीगोंदा : 22 (28326)
नेवासा : 17 (18712)