Ahilyanagar Municipal Corporation Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar E-Governance Ranking: ई-गव्हर्नन्स सुधारणेत अहिल्यानगर महापालिका राज्यात टॉप 10 मध्ये

200 पैकी 160 गुण; एआय चॅटबॉट, ई-ऑफिस आणि डिजिटल सेवांमुळे महापालिकेची कामगिरी उजवी

पुढारी वृत्तसेवा

नगर: नागरिकांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिकाधिक जलद व सुरळीत सेवा उपलब्ध करून देण्यासाठी, प्रशासकीय कामकाजाला गती देण्यासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार ई-गव्हर्नस सुधारणा कार्यक्रमांतर्गत महानगरपालिकेने विविध उपक्रम हाती घेतले. संकेतस्थळ अद्ययावत करणे, एआय चॅटबॉटसारख्या सुविधांच्या माध्यमातून सेवा देण्याचा प्रयत्न केला. शासनाने कामगिरीचे मूल्यमापन करत 200 पैकी 160 गुण दिले आहेत. त्यामुळे ई-गव्हर्नन्स सुधारणेत अहिल्यानगर महापालिकेने राज्यात पहिल्या दहा क्रमांकांमध्ये स्थान मिळविले आहे.

आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे म्हणाले, की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेमधून महाराष्ट्र राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय विभागांमध्ये 150 दिवसांचा ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम राबविण्यात आला होता. निवडणूक कार्यकाळामुळे त्याची मुदत वाढवण्यात आली. 7 मे 2025 ते 10 जानेवारी 2026 अखेर सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये ई-गव्हर्नन्सअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या सुधारणांचा विचार करून त्यांचे मूल्यमापन करून त्यांना गुणांकन देण्यात आले.

त्यामध्ये अहिल्यानगर महानगरपालिकेला उत्कृष्ट संकेतस्थळाकरिता, आपले सरकार व लोकसेवा, ई - ऑफिस कार्यप्रणाली, विविध ऑनलाइन सेवांच्या डॅशबोर्ड, नावीन्यपूर्ण वेब प्लीकेशनअंतर्गत नागरिकांना व्हॉट्अपद्वारे देण्यात येणाऱ्या सेवा व मदतीकरता, नागरिकांना देण्यात येणाऱ्या एआय हेल्पलाईनसाठी व कार्यालयांमध्ये विविध विकास कामांकरिता जीआयएसच्या वापरासाठी असे एकूण 200 पैकी 160 गुण मिळाले आहेत.

विविध निकषांच्या आधारावर महाराष्ट्र शासनाने सर्व 29 महापालिकेतून पहिल्या 10 उत्कृष्ट महानगरपालिकांची निवड केली आहे. त्यामध्ये विविध निकषांच्या आधारावर अहिल्यानगर महानगरपालिकेने 160 गुणांकनासह प्रथम दहा उत्कृष्ट महापालिकेमध्ये स्थान मिळवले आहे. आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांच्या अधिपत्याखाली व सातत्यपूर्ण मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त विजयकुमार मुंडे यांच्या नियंत्रणाखाली संगणक विभाग प्रमुख, तांत्रिक सहाय्यक व कर्मचारी यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले. नागरिकांना तात्काळ व सुरळीत सेवा मिळावी, आवश्यक माहिती संकेतस्थळाच्या माध्यमातून उपलब्ध व्हावी, यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहे.

व्हॉटस्‌‍अप चॅनेल, एआय चॅटबोट, फेसबूक पेज, संकेतस्थळ या माध्यमातून तक्रारीसाठी, माहिती मिळवण्यासाठी सुविधा देण्यात आल्या आहेत. अधिकाधिक जलद कामकाज व्हावे, यासाठी प्रशासकीय फायलीचे ई-ऑफिस कार्यप्रणालीच्या माध्यमातून ऑनलाईन काम सुरू करण्यात आले आहे. यामुळे कामकाजात सुधारणा, अचूकता येऊन जलद सेवा देता येईल.
यशवंत डांगे, आयुक्त तथा प्रशासक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT