Ahilyanagar Municipal Corporation Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar Municipal Budget: अहिल्यानगर मनपा बजेटवरून खळबळ; पाणीपट्टी 25% कमी करण्याची मागणी

अहिल्यादेवी होळकर पुतळा, नशामुक्ती केंद्रासह विविध प्रस्ताव; फुगवलेल्या बजेटवर नगरसेवकांचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

नगर: शहरातील पत्रकार चौकात अहिल्यादेवी होळकर यांचा भव्य पुतळा उभारण्यासाठी पाच कोटींची तरतूद करावी, अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक महोत्सवासाठी 25 लाख द्यावेत, पिंपळगाव माळवी येथे नशामुक्ती केंद्र उभारावे, एकल महिलांसाठी वसतिगृह उभारावे आणि बालसंस्कार केंद्रासाठी एक कोटींची तरतूद करावी, वृद्धाश्रमासाठी खास निधीची तरतूद करावी; यासह पाणीपट्टीच्या करात 25 टक्के कपात करण्याची शिफारस स्थायी समिती सभापती सुभाष लोंढे आणि सदस्य निखील वारे, बाबासाहेब वाकळे यांनी सुचविल्या.

महापालिका स्थायी समितीत आज सभापती लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली बजेटवर चर्चा झाली. या वेळी निखील वारे, बाबासाहेब वाकळे, सुरेश बनसोडे, मनोज कोतकर, मनोज दुलम, आकाश कातोरे, संध्या पवार, पौर्णिमा गव्हाळे, सोनाबाई शिंदे, आयुक्त यशवंत डांगे, नगरसचिव मेहेर लहारे आदी उपस्थित होते. महापालिकेला पाणीपट्टी, घरपट्टीसह अन्य करामधून किती पैसे मिळणार आणि त्यातील किती पैसे खर्च होणार याचा ताळेबंद लागत नसल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. बजेटचे आकडे पाहिले तर, हे फक्त नागरिकांना खूश करण्यासाठी बजेट तयार केल्याचे दिसून येते.

त्यासाठी खर्चात काटकसर करा. कार्यालयीन खर्च कमी करावा, अशा सूचना सदस्यांनी दिल्या. महापालिका प्रशासनाने उत्पन्नांचा ताळमेळ न घेता फुगीर बजेट सादर केले. त्यातून नगरकरांसह नगरसेवकांची ही फसवणूक केली आहे. महापालिकेला 11 महिन्यात अवघे 60 कोटी वसूल झाले. त 201 कोटी वसूल होणे आवश्यक होते. मनपचा बांधिल खर्च 350 कोटी आहे. त्यामुळे येणे कमी आणि खर्च जास्त होत आहे. उत्पन्नवाढीचे पर्याय दिसून येत नाही. घरपट्टी, शहरातील पत्राशेड, जाहिरात फलक यातून मनपा उत्पन्न मिळू शकते. मात्र, त्याकडे कोणीही लक्ष देत नाही. खोटे आकडे टाकून बजेट फुगविण्यात आले, असा आरोप करण्यात आला. दरम्यान, कुत्री पकडण्यासाठी 3 कोटींच्या निधीची तरतूद करावी, अशी मागणी सभापती लेोंढे यांनी केली.

बेकायदा वृक्षतोड थांबवा

शहरात अनेक ठिकाणी बेकायदा वृक्ष तोड होत आहे. वृक्ष तोडणाऱ्यांवर थेट गुन्हा दाखल झाला पाहिजे, असा सवाल नगरसेवक सुरेश बनसोडे यांनी केला. त्यावर विनापरवाना वृक्षतोड करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा आयुक्त डांगे यांनी दिला. जीएसटी अनुदान वाढविण्यासाठी प्रत्यन करावे, अशी मागणी नगरसेवकांनी केली.

150 कोटींची पाणीपट्टी थकीत

मुळा धरणापासून मुख्य जलवाहिनी निघाल्यानंतर लगतच्या गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यातील चार ते पाच गावांकडे सुमारे 150 कोटींची पाणीपट्टी थकीत आहे. ती वसूल करा अथवा त्यांचे नळकनेक्शन कट करा, अशी मागणी करण्यात आली.

पाणीपट्टी 25 टक्के कमी करा: लोंढे

महापालिकेने पाणीपट्टी दर वाढवले असून, घरपट्टीच्या वाढीव मूल्यांकनामुळे नागरिक संतप्त आहेत. त्यामुळे पाणीपट्टीच्या दरात 25 टक्के कपात करावी. करयोग्य मूल्य निश्चित करताना भाडेकरू असलेला सामान्य दर विचारात घेऊन शिफारस सुभाष लोंढे यांनी केले.

आयुक्त यशवंत डांगे म्हणाले

महापालिका स्थापनेपासून कोणतीही करवाढ झाली नव्हती. तब्बल 22 वर्षांनंतर पाणीपट्टीत वाढ करण्यात आली. कारण पाणीपुवठा योजनेसाठी सुमारे 50 कोटी रुपयांचा खर्च असून, वसुली केवळ दहा कोटी होते. त्यामुळे पाणीपट्टीत वाढ करण्यात आली. पूर्वी 1500 रुपये पाणीपट्टी होती, ती आता 2400 रुपये करण्यात आली. त्यामुळे पाणीपट्टीतून दुप्पट उत्पन्न मिळणार आहे. ज्यांचे क्षेत्रफळ वाढले त्यांना वाढीव घरपट्टी देण्यात आली आहे. त्यांच्या तक्रारी असून, त्यावर सुनावणी होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT