राहुरी: अहिल्यानगर-मनमाड राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामाचा अखेर रात्रं-दिवस श्रीगणेशा करण्यात आला आहे. दरम्यान, याप्रश्नी दैनिक पुढारीने बातम्यांची मालिका सुरु ठेवल्यामुळे या कामास गती देण्यात आली आहे. महामार्गावर वाढलेल्या अपघातांची मालिकांसह नागरिकांचा तीव्र संताप लक्षात घेता, अखेर प्रशासनास खडबडून जाग आली आहे. रस्त्याच्या कामाला गती देण्यात आली आहे. भारत कन्स्ट्रक्शन कंपनीने मनुष्यबळ वाढवून राहुरी हद्दीत दिवस-रात्र काम सुरू केले आहे, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
येत्या महिन्याभरात अहिल्यानगर-मनमाड रस्त्याच्या एकेरी बाजूचे डांबरीकरण पूर्ण केले जाणार आहे, असा दावा करण्यात आला आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी काम सुरू असलेल्या ठिकाणी बॅरिगेट्स, एकेरी वाहतूक दर्शवणाऱ्या पट्ट्यांसह दिशादर्शक सूचना फलक उभारले आहेत.
नागरिकांचा रोष, कृती समितीचा इशारा
अहिल्यानगर-मनमाड महामार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात होत असल्यामुळे नागरिकांचा रोष दिवसें-दिवस वाढत आहे. अहिल्यानगर-मनमाड रस्ता कृती समितीने बैठक घेऊन, रस्त्याच्या संथ कामकाजाबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली होती. विनाकारण रस्ता उखडवून, काम रखडविल्याचा आरोप करण्यात आला होता.
या पार्श्वभूमीवर कृती समितीसह माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी, जनआंदोलन उभारण्याचा इशारा दिला होता. महामार्गावर मोठ-मोठे खड्डे, तर एका बाजूला पूर्णतः उखडलेले डांबर यामुळे वाहतुकीला प्रचंड अडथळे निर्माण झाला होता.
महामार्ग प्राधिकरणचे ठेकेदाराला आदेश
अखेर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांनी ठेकेदार कंपनी भारत कन्स्ट्रक्शनला मनुष्यबळ व यंत्रसामग्री वाढविण्यासह काम सुरू असताना प्रवाशांच्या सुरक्षेसाठी उपाय-योजना करण्याचे स्पष्ट आदेश दिले. यानुसार राहुरी हद्दीत रस्ता कामाला वेग देण्यात आला आहे. दिवस-रात्र काम करण्यासाठी अधिकारी, कर्मचारी व मजूर तैनात करण्यात आले आहेत. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ठिक-ठिकाणी सूचना फलक, बॅरिगेट्स व एकेरी-दुहेरी वाहतुकीचे मोठे दिशादर्शक फलक उभारले जात आहेत.
पोलिस कुठे आहेत?
महामार्गाचे काम सुरू असताना अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने रस्त्याच्याकडेला उभी करुन, वाहतुकीचा खोळंबा करीत आहेत. छोट्या अपघातानंतर होणारे वाद, अरेरावी करणारे चालक अशातच अपुऱ्या पोलिसांमुळे परिस्थिती आणखी गंभीर होत आहे.
तनपुरेंनी उतरून दाखवले.. प्रशासन मात्र शब्दांपुरतेच
सायंकाळच्या वेळी राहुरीत वाहतूक पूर्णतः ठप्प झाल्याचे पाहून, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे स्वतः रस्त्यावर उतरले. तासाभराहून अधिक काळ त्यांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी पुढाकार घेतला. कार्यकर्त्यांसह पालिका पदाधिकारी रस्त्यावर उतरले. यातून राजकीय इच्छाशक्ती दिसते, मात्र प्रशासकीय जबाबदारी अद्याप संशयात आहे.