BJP NCP Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar Municipal Election Alliance: महापालिका निवडणूक; प्रभाग 1 व 11 मध्ये भाजप-राष्ट्रवादीची मैत्रिपूर्ण लढत

फिप्टी-फिप्टी फॉर्म्युला राबवूनही दोन प्रभागांत तिढा; अहिल्यानगरच्या राजकारणात नवे गणित

पुढारी वृत्तसेवा

नगर: भाजप-राष्ट्रवादीची युती झाली असून भाजप आणि राष्ट्रवादीने प्रत्येकी 32 जागा घेत फिप्टी-फिप्टीचा फॉर्म्युला राबविला आहे. मात्र प्रभाग 1 आणि प्रभाग 11 मध्ये दोघांची मनधरणी करण्यात अपयश आल्याने तेथे मैत्रिपूर्ण लढतीचा निर्णय घेण्यात आला. राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांच्या प्रभाग 1 मधील ओबीसी महिलेसाठी राखीव जागेवर मैत्रिपूर्ण लढत होत आहे. संपत बारस्कर हे सतीश ढवण यांच्या उमेदवारीसाठी आग्रही होते, तर भाजपकडून दिवंगत माजी नगरसेवक दिगंबर ढवण यांच्या पत्नी शारदा ढवण यांच्या उमेदवारीचा आग्रह धरण्यात आला. शेवटपर्यंत तोडगा न निघाल्याने दोन्ही पक्षांनी या जागेवर मैत्रिपूर्ण लढतीचा निर्णय घेतला.

असाच पेच नालेगावचा समावेश असलेल्या प्रभाग 11 मध्ये उद्भवला. तेथे भाजपने विकास किशोर वाघ यांना उमेदवारी दिली, तर त्याच जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस सागर किरण शिंदे यांच्यासाठी आग्रही होती. या वार्डात भाजपने दीप्ती सुवेंद्र गांधी आणि सुभाष सोपनराव लोंढे यांना उमेदवारी दिली. राष्ट्रवादीने आशा किशोर डागवाले आणि सागर शिंदे यांच्यासाठी आग्रह धरला; मात्र भाजपने विकास वाघ यांची उमेदवारी कापण्यास नकार दर्शविला. त्यामुळे या प्रभागातील एका जागेवर मैत्रिपूर्ण लढतीचा निर्णय घेण्यात आला.

भाजप-राष्ट्रवादीचे बेरजेचे राजकारण

महापालिका निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादी-शिवसेना महायुती होईल, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, सेनेच्य़ा जागेवर भाजपने दावा केल्याने सेनेने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादी-भाजपची युती झाली तरी क्षमता पाहून उमेदवारी निश्चिती करताना दोन्ही पक्षांच्या नेतृत्वाचा कस लागला. जागा वाटप व विजयाचे निकष पाहून बेरीज करताना ॲडजस्टमेंट करावी लागली. परिणामी राष्ट्रवादीच्या इच्छुकांना भाजपची, तर भाजपच्या इच्छुकांना राष्ट्रवादीची उमेदवारी करावी लागली.

स्वबळाचा नारा; पण अपुरा

सन्मानजनक जागा न मिळाल्याने स्वबळाचा नारा देत शिवसेनेने सवतासुभा मांडला. पण सर्वच 68 जागांवर उमेदवार देण्यात स्वबळाचा नारा अपुरा पडला. शिवसेना 54 जागांवर उमेदवार देऊ शकली. आठ प्रभागांत पूर्ण पॅनल करण्यात शिवसेनेला अपयश आले. 1, 2, 4, 5, 10, 13, 14, 17 नंबरच्या प्रभागात शिवसेनेला उमेदवार मिळू शकले नाहीत. माजी महापौर मिस्टर अनिल शिंदे व संजय शेंडगे स्वत: उमेदवार झाले. माजी महापौर सुरेखा संभाजी कदम यांना मात्र उमेदवारी मिळाली. म

राष्ट्रवादी-भाजपकडून नवख्यांना संधी

राष्ट्रवादी-भाजप युतीने उमेदवार देताना नव्या जुन्यांचा मेळ घातला. अनेक ठिकाणी नवे चेहरे देत जुन्यांची मनधरणी केली. राष्ट्रवादीने मोहित प्रदीप पंजाबी, बाबासाहेब नागरगोजे, किरण दाभाडे, सोमा शिंदे, आरती रासकर, सुरेश बनसोडे, सुजाता महेंद्र पडोळे, मयूर बांगरे, अश्विनी सुमीत लेोंढे या नव्यांना संधी दिली आहे. तर, भाजपने ऋग्वेद महेंद्र गंधे, सुनीता श्रीकृष्ण कुलकर्णी, करण कराळे, आशाबाई कातोरे, महेश लोंढे, महेंद्र बिज्जा, सागर मुर्तडकर, विकास वाघ, दत्ता गाडळकर, सुजय मोहिते यांना नव्याने संधी दिली आहे.

एबी फॉर्मवर खाडाखोड

महायुतीमध्ये अखेरच्या क्षणी मिठाचा खडा पडल्याने अनेक इच्छुकांची धावपळ सुरू झाली. शिवसेनेकडून उमेदवारी मिळविण्यासाठी अनेकांनी फोनाफोनी केली. दरम्यान, एबी फॉर्मवर आधीच नावे टाकल्याने अडचण निर्माण झाली होती. अनेकांना व्हाईटनर लावून नव्याने नाव टाकून एबी फॉम देण्यात आले. त्यामुळे ते अर्ज आता ग्राह्य धरले जाणार की बाद ठरविले जाणार हे अर्ज छाननीतच समजणार आहे.

आयारामांना शिवसेनेची लॉटरी

उषा मंगेश भिंगारदिवे, स्वप्नजा विनय वाखुरे, अतिम खामकर, श्रद्धा रवींद्र वाकळे, रूपाली संदीप दातरंगे, अभिजित भिंगारदिवे, ओंकार सातपुते, हर्षवर्धन कोतकर या आयारामांना शिवसेनेने उमेदवारी दिली.

मुकुंदनगरमध्ये काँग्रेस-एमआयएम लढत

महापालिकेच्या प्रभाग चारमध्ये मुकुंदनगर हा मुस्लिम बहुल परिसर येतो. या प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेनेने सपशेल माघार घेत एकही उमेदवार दिला नाही. मविआत हा प्रभाग काँग्रेसच्या कोट्यात गेला. त्यामुळे तेथे काँग्रेसने चार उमेदवार दिले. काँग्रेस उमेदवाराचा सामना एमआयएमशी होत आहे.

भाजपने डावलले, मंडलाध्यक्ष अपक्ष

भाजपचे सावेडी मंडलाध्यक्ष सीए राजेंद्र काळे व त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका मनीषा बारस्कर-काळे या उमेदवारीसाठी इच्छुक होत्या; पण भाजपने दोघांनाही उमेदवारी नाकारली. त्यामुळे या दोघांचेही अपक्ष उमेदवारी अर्ज राहिले आहेत. आता ते दोघे माघार घेणार की अपक्ष लढणार हे शुक्रवारी माघारीनंतर समजेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT