Kharif Sowing Pudhari
अहिल्यानगर

Kharif Sowing: नगर तालुक्यात खरिपाच्या ८० टक्के पेरण्या; मुगाच्या क्षेत्रात मोठी घट

सोयाबीनची लागवड वाढली; रिमझिम पावसाने पिकांना नवसंजीवनी

पुढारी वृत्तसेवा

नगर तालुका: नगर तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामातील सुमारे ४९ हजार हेक्टर क्षेत्रापैकी ४२ हजार ६५ हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच सुमारे ८० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.

मात्र, पावसाच्या लहरीपणामुळे शेतकरी चिंतेत असून, दमदार पावसाअभावी खरीप हंगाम अजूनही धोक्यात असल्याचे चित्र आहे. तालुक्यात पडत असलेल्या तुरळक रिमझिम पावसामुळे उगवून आलेल्या पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे.

मृग व रोहिणी नक्षत्र कोरडे गेल्याने पेरण्या रखडल्या होत्या. आर्द्रा व पुनर्वसू नक्षत्रांत झालेल्या पावसाचा आधार घेत शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या. सुरुवातीला पाऊस खंडित झाल्यामुळे बहुतांशी भागात मुगाची पेरणीच झाली नाही.

परिणामी मुगाच्या लागवड क्षेत्रात मोठी घट झाली आहे. सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे. मुगाची पेरणी अवघी साडेतीन हजार हेक्टर क्षेत्रावर झाली, तर सोयाबीनची पेरणी वीस हजार हेक्टर क्षेत्रावर झाली आहे.

रिमझिम पावसामुळे पेरणी झालेल्या पिकांना नवसंजीवनी मिळाली असली, तरी दमदार पावसाची अजूनही प्रतीक्षा कायम आहे. जुलै संपत आला तरी तालुक्यातील बहुतांशी तलाव, बंधारे, विहिरी व कूपनलिका अद्याप कोरड्याच आहेत.

अनेक गावांची पिण्याच्या पाण्याची गरज टँकरद्वारे भागवावी लागत आहे. शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे. पुष्य नक्षत्रासह पुढील नक्षत्रात होणाऱ्या पावसावरच खरीप व आगामी रब्बी पिकांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.

लाल कांद्याची रोपे मोठ्या प्रमाणात टाकली जातात. परंतु पाण्याअभावी लाल कांद्याची रोपे टाकली गेली नाही. त्यामुळे लाल कांद्याच्या उत्पादनावर मोठा परिणाम होणार असल्याची भीती व्यक्त होत आहे.

तालुक्यात सोयाबीनच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली असून, पारंपरिक पिकांच्या तुलनेत शेतकऱ्यांचा कल सोयाबीनकडे वाढल्याचे दिसून येत आहे. पावसाने साथ दिली नाही, तर या पिकालाही फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे नगर तालुक्यातील बळीराजाला जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.

रिमझिम पावसाने पिकांना जीवदान दिलं पण बळीराजाच्या चेहऱ्यावर चिंतेचं सावट अजूनही कायम आहे. खरीप आणि रब्बी हंगामाचे भवितव्य आगामी नक्षत्रात होणाऱ्या पावसावर अवलंबून आहे.
-तुकाराम मगर, शेतकरी, ससेवाडी
दोन एकर सोयाबीनची पेरणी केली. मशागत, बियाणे आणि पेरणीसाठी मोठा खर्च झाला आहे. अद्याप दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे पीक हातात येईल की नाही याची शाश्वती नाही. जोरदार पावसाचीच प्रतीक्षा आहे.
-सूरज तोडमल, शेतकरी, जेऊर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT