Illegal Cables Hoardings Action Pudhari
अहिल्यानगर

Illegal Cables Hoardings Action: पथदिव्यांच्या खांबांवरील अनधिकृत केबल व फलकांवर महापालिकेची कारवाई

अहिल्यानगरमध्ये बेकायदेशीर केबल कट; जाहिरातदार व कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

नगर: महानगरपालिकेच्या मालकीच्या पथदिव्यांच्या खांबावरील इंटरनेट व टीव्ही केबल, विनापरवाना फलक तत्काळ काढून घ्यावेत. विनापरवाना केबल टाकणाऱ्या कंपन्यांवर व फलक लावणाऱ्या जाहिरातदारांवर महापालिकेने कारवाई सुरू केली आहे. विनापरवाना फलक व केबल तोडून हटवण्यात येत आहेत. तसेच, फलक लावणाऱ्यांवर व केबल टाकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा आयुक्त यशवंत डांगे यांनी दिला आहे.

अहिल्यानगर शहरात सर्वत्र महानगरपालिकेचे पथदिव्यांचे खांब आहेत. शहरातील जाणाऱ्या प्रमुख रस्ते व महामार्गांवरही पथदिव्यांचे खांब आहेत. छत्रपती संभाजीनगर, पुणे, मनमाड महामार्गावर, तसेच उड्डाणपुलाच्या खांबावर अनेक टीव्ही केबल कंपन्या व इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांकडून त्यांच्या केबल टाकण्यासाठी बेकायदेशीरपणे महानगरपालिकेच्या खांबांचा वापर केला जात आहे.

या खांबांवरून महानगरपालिकेच्या पथदिव्यांच्या वीज वाहक तारा टाकलेल्या असतात. त्याच ठिकाणी कोणतीही परवानगी न घेता धोकादायक पद्धतीने या केबल टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे एखादा अपघात किंवा मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पथदिव्यांच्या खांबांवरून या केबल हटवणे आवश्यक आहे. तसेच, नव्याने उभारण्यात आलेल्या पथदिव्यांच्या खांबांवर जाहिरातीचे फलक लावण्यात येत आहेत.

यापूर्वी असे फलक लावणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. येत्या काळात ही कारवाई तीव्र करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील सर्व टीव्ही व इंटरनेट केबल टाकणाऱ्या कंपन्यांनी तात्काळ सदरच्या केबल काढून घ्याव्यात. ज्यांनी अनधिकृत फलक लावले आहेत, त्यांनी ते काढून घ्यावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

केबल काढण्याची मोहीम

महानगरपालिकेने अशा केबल व फलक हटवण्यासाठी कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. केबल कट करून काढण्यात येत आहेत. या कारवाईमुळे कोणतीही सेवा विखंडित झाल्यास, यामुळे कोणत्याही प्रकारचे व कोणाचेही नुकसान झाल्यास त्याला महानगरपालिका जबाबदार राहणार नाही. तसेच संबंधितांवर महानगरपालिका गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करेल, असा इशारा आयुक्त यशवंत डांगे यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT