अहिल्यानगरमध्ये दिवसाजड वाहनांना नो एन्ट्री; अधिसूचना जारी Pudhari
अहिल्यानगर

Heavy Vehicle Ban: अहिल्यानगरमध्ये दिवसाजड वाहनांना नो एन्ट्री; अधिसूचना जारी

रात्री फक्त ‘अत्यावश्यक’साठीच प्रवेश

पुढारी वृत्तसेवा

Ahilyanagar heavy vehicles no entry

नगर: अहिल्यानगर शहराच्या हद्दीत सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत जड व हलकी मालवाहतूक करणार्‍या वाहनांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. फक्त रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेतच अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक करणार्‍या वाहनांना प्रवेश दिला जाणार असल्याची अधिसूचना जिल्हादंडाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी जारी केली आहे. या अधिसूचनेमुळे आता दुपारी शहरातील वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होणार आहे.

यापूर्वी जीवनावश्यक वस्तू वाहून नेणार्‍या वाहनांना अहिल्यानगर शहरातील बाजारपेठेत दुपारी 1 ते 3 या वेळेत प्रवेश दिला जात होता. त्यामुळे या दोन तासांत अधिक संख्येने अवजड वाहने शहरात दाखल होत होती. त्यामुळे साहजिकच शहरातील मध्यवस्ती तसेच इतर मार्गावर वाहतूक कोंडी होऊन शहरातील नागरिकांचे हाल होत. तसेच काही ठिकाणी अपघातदेखील झाले आहेत. यातून नागरिकांची सातत्याने ओरड सुरू होती. (Latest Ahilyanagar News)

नागरिकांच्या तक्रारीवरून तसेच शहरातील वाहतूक सुरळीत राहावी यासाठी दुपारी होणारी अवजड मालवाहतूक बंद करावी, अशी विनंती पोलिस अधीक्षकांनी जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांच्याकडे केली होती. या विनंतीनुसार जिल्हाधिकार्‍यांनी अधिसूचना जारी केली.

सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत जड मालवाहतूक करणार्‍या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणार्‍या वाहनांना फक्त रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेतच प्रवेश दिला जाणार असल्याचे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.

नवीन नियमांनुसार, सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील अन्नधान्य वाहतूक करणारी वाहने व निवडणुकीच्या कर्तव्यासाठी लागणारी वाहने याला अपवाद आहेत. मात्र, इतर कोणतीही हलकी किंवा जड मालवाहतूक करणारी वाहने सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत शहराच्या हद्दीत येऊ शकणार नाहीत. याशिवाय, शहरातील सार्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्यांच्या कडेला मालवाहतूक करणारी कोणतीही वाहने उभी करण्यासही बंदी घालण्यात आली आहे. हा नियम रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेव्यतिरिक्त इतर वेळी लागू असणार असल्याचे अधिसूचनेत म्हटले आहे.

वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग

मनमाड व छत्रपती संभाजीनगरकडून पुणे व कल्याणकडे जाणार्‍या जड वाहनांना आता शहरातील मुख्य मार्गाऐवजी शेंडी-निंबळक-केडगाव मार्गे वळवण्यात येईल. पुण्याकडून येऊन मनमाड व छत्रपती संभाजीनगरकडे जाणार्‍या वाहनांना केडगाव-निंबळक-शेंडी मार्गे वळवावे लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT