Ahilyanagar Goreshwar Rural Non-Agricultural Credit Socity news
पारनेर : पुढारी वृत्तसेवा
गोरेश्वर ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेस पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी गोरेश्वर सहकार संस्थापक पॅनेल कटिबद्ध असून, जिरवाजिरवीच्या राजकारणात संस्था संपवण्याचा घाट विरोधी श्री गोरेश्वर सहकार बचाव पॅनलने घातला असल्याचा आरोप पॅनलचे मार्गदर्शक अंबादास नरसाळे यांनी केला आहे.
गोरेश्वर पतसंस्थेच्या निवडणुकीत संस्थापक बाजीराव पानमंद पॅनेलने मतदारांचा विश्वास राखत निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. निवडणुकीत विरोधकांनी संस्थेची बदनामी करत संस्थापक माजी चेअरमन बाजीराव पानमंद यांना काही संचालकांना संस्थेत घेण्यास भाग पाडले. त्या वेळी ठेवीदारांचा विचार करत संस्थेचे हित लक्षात घेत निवडणूक बिनविरोध करून विरोधकांना संस्थेच्या सत्तेत सहभागी करून घेतले. मात्र, याच विरोधकांनी संस्थेला आतून पोखरण्याचे काम केले.
संस्था सुस्थितीत असताना चुकीचा अपप्रचार करत संस्थेची आर्थिक स्थिती ढासळल्याचे भासवले व संस्थेची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. ठेवीदारांमध्ये अविश्वास निर्माण केला हेच कमी की काय तर सात संचालकांनी राजीनामा देत संस्था अल्पमतात आणली व संस्थेवर प्रशासक लागले. काही वर्ष प्रशासक संस्थेवर असताना व ठेवीदारांना संस्थेची आर्थिक स्थिती चांगली आहे हे समजल्यानंतर विरोधी गट तोंडावर पडला. त्यानंतर संस्थेची पुन्हा निवडणूक लागली. संस्थेची आर्थिक स्थिती चांगली नसल्यामुळे विरोधकांनी राजीनामे दिले. मग पुन्हा विरोधक कशासाठी निवडणूक लढवत आहे, असा प्रश्नही मतदारांना पडला आहे.
गोरेश्वर पतसंस्थेचे संस्थापक बाजीराव पानमंद यांनी २५ वर्षांहून अधिक काळ संस्थेचा पारदर्शक कारभार केला. हा कारभार गावातील राजकीय मंडळींना भावला नाही. त्यांनी संस्थेला बदनाम करण्याचे प्रयत्न सुरू केले. संस्था व ठेवीदार यांच्यामध्ये गैरसमज निर्माण झाले; पण संस्थेची आर्थिक स्थिती चांगली असल्याने ठेवीदार विरोधकांच्या भूलथापांना बळी पडल्याचे लक्षात आले. निवडणुकीनंतर पुन्हा विरोधकांना संधी दिल्यास ठेवेदारांच्या ठेवी, तसेच पतसंस्थेची स्थिती काय होईल हे सभासद मतदारांना सांगायची गरज नाही.
संस्थापक चेअरमन बाजीराव पानमंद यांना पतसंस्थेमुळे कौटुंबिक व सामाजिक झालेला त्रास विसरून पतसंस्थेला गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी, ठेवीदारांच्या ठेवींना संरक्षण देण्यासाठी व विरोधकांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरण्याच्या निर्णय घेतला. या निर्णयाला पतसंस्थेतील सभासद मतदारही पाठिंबा देत असल्याचे दिसून येत आहे.
विरोधकांना कोणत्या आधारे निवडणुकीत सभासद मतदारांनी मतदान करायचे? ज्या विरोधकांनी पतसंस्था अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला एकत्रित राजीनामा देऊन अडचणीच्या काळात प्रशासक नेमले व निवडणूक लागल्यानंतर पुन्हा मतदारांसमोर जाऊन त्यांना काय आश्वासन देणार आहेत, असा सवाल उपस्थित होत आहेत.