करंजी: इराण-अमेरिका यांच्यातील युद्धामुळे गेल्या काही दिवसांपासून घरगुती गॅस सिलेंडर अथवा व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळणे कठीण झाले आहे. घरगुती गॅस सिलेंडर घेण्यासाठी कडक उन्हात ग्राहकांना वितरण एजन्सीसमोर रांगेत उभे राहण्याची वेळ आली आहे.
नगर तालुक्यातील कौडगाव-जांब येथे घरगुती गॅस सिलेंडर घेण्यासाठी ग्राहकांनी रांगा लावल्याचे दिसून येत आहे. ओटीपी शिवाय सिलेंडर मिळत नसल्यामुळे ग्राहकांना सातत्याने मोबाईल मध्ये ओटीपीची प्रतीक्षा करावी लागत आहे. तसेच शहरी भागामध्ये 30 दिवसांनी सिलेंडर मिळत आहे. मात्र, ग्रामीण भागात 45 दिवसांनी सिलेंडर मिळत असल्याने ग्रामीण भागातील ग्राहकांची देखील मोठी गैरसोय होत आहे.
ग्रामीण भागात देखील आता रॉकेल अथवा लाकडी सरपण उपलब्ध होत नसल्याने बहुतांश लोक आता सर्रास गॅस सिलेंडरचा उपयोग करीत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागाला देखील 30 दिवसाला गॅस सिलेंडर मिळाले पाहिजे, अशी घरगुती गॅस वापरणाऱ्या ग्राहकांची मागणी आहे. अनेक वेळा तांत्रिकदृष्ट्या ऑनलाईन बुकिंग होत नसल्याने ग्राहकांची एजन्सीच्या लोकांशी शाब्दिक चकमक होत आहे.
पुढच्या महिन्यात पावसाळा सुरू होत असल्याने जून महिन्यापासून घरगुती गॅसच्या मागणीत मोठी वाढ होणार आहे. व्यवसाय सिलेंडरचे भाव देखील मोठे प्रमाणात वाढल्याने हॉटेल व्यावसायिकांना देखील गॅस सिलेंडरसाठी मोठी कसरत करावी लागते. अनेक वेळा गॅस सिलेंडर उपलब्ध होत नसल्याने हॉटेल बंद ठेवण्याची वेळ करंजी तिसगाव, मिरी, पाथर्डी या भागातील हॉटेल व्यावसायिकावर येत आहे.
तीस दिवसांनी सिलेंडर द्या
ग्रामीण भागात एकत्रित कुटुंबांची संख्या मोठी आहे. त्यामुळे घरगुती गॅस मोठ्या प्रमाणात एकत्रित कुटुंबामध्ये वापरला जातो त्यामुळे 45 दिवसाऐवजी 30 दिवसाला ग्रामीण भागातील ग्राहकांना गॅस सिलेंडर मिळाले पाहिजे, अशी ग्राहकांची मागणी असल्याने अनेक वेळा महिनाभरात गॅस सिलेंडर संपल्यानंतर ग्राहकांची मोठी गैरसोय होत असल्याचे गॅस एजन्सीच्या अधिकृत वितरक उषा कराळे, संगीता अकोलकर यांनी म्हटले आहे.