वळण: कुठल्याही प्रकारची निवडणूक नसताना मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी मोठी अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजना घेतली आहे, असे प्रतिपादन जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
मंत्री विखे पाटील यांनी शुक्रवारी दिवसभर राहुरी तालुक्यातील राहुरी स्टेशन, मानोरी, वळण, केंदळ खुर्द येथील विविध विकासकामाचे लोकार्पण तसेच सुरू असलेल्या शासकीय इमारतींच्या कामाची पाहणी करून त्यांनी कामाचा आढावा घेतला. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी आ. अक्षय कर्डिले, तालुक्यातील भाजपाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, शासकीय अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी मंत्री विखे पाटील म्हणाले, तरुण व्यसनाधीनताकडे दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. अमली पदार्थाच्या सेवनामुळे घरे उध्वस्त होत आहे. या तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी प्रत्येक ठिकाणी विकास केंद्र तसेच राहुरी एमआयडीसीमध्ये वेगवेगळे मोठे उद्योग आणून सुमारे पाच हजार युवकांना नोकरी देण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्नशील आहे.
त्यासाठी राहुरी विद्यापीठाची चौदाशे एकर जमिनीची अधिकृत मागणी मुख्यमंत्र्याकडे केली असून त्या ठिकाणी ही चांगले उद्योग उभारून या तरुणाच्या हाताला आपल्याला उद्योग व काम देता येईल.
यावेळी त्यांनी विविध प्रश्नांना हात घालत या भागातील रस्त्याचे प्रश्न निश्चितपणे मार्ग लावण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी शेतकरी, कार्यकर्ते, महिला भगिनी, बचत गटाच्या महिला, मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पाणीदार मंत्री
यावेळी आ. अक्षय कर्डिले म्हणाले, आपले ना. विखे पाटील केवळ पालकमंत्री नाही तर पाणीदार मंत्री आहेत. कालच त्यांनी मुळा धरणातून व डावा कालवा व वांबोरी चारी एकला पाणी सोडले. आज ते पाणी गावागावात पोहोचत आहे.