नगर : बनावट मिळकती, बनावट मालक, बनावट लोकं आणि त्यांच्या बनावट सह्या घेऊन केलेल्या खरेदी-विक्रीतून एका डॉक्टरची तब्बल 14 कोटी 66 लाख 51 हजारांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी 30 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.(Latest Ahilyanagar News)
याबाबत पोलिसांकडून समजलेल्या माहितीनुसार, डॉ. अनिल सूर्यभान आठरे हे सावेडी येथील असून, ते वैद्यकीय व्यवसाय करतात. डॉ. आठरे यांच्याशी माजी नगरसेवक स्वप्नील शिंदे व अमोल जाधव यांनी त्यांच्या साथीदारांसह जमिनीचे काही खरेदी आणि विक्रीचे व्यवहार केले. यातून डॉ. आठरे यांचा त्यांनी विश्वास संपादन केला.
मात्र निंबळक शिवारात गट नंबर 180 च्या व्यवहारामध्ये आपली फसवणूक झाल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. त्यांनी एमआयडीसी पोलिसात धाव घेऊन फिर्याद दिली. सहायक पोलिस निरीक्षक माणिक चौधरी यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक परदेशी तपास करत आहेत.
दि.8 डिसेंबर 2017 ते 8 फेब्रुवारी 2021 या कालावधीत ही फसवणूक झाल्याचे डॉ. आठरे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. डॉक्टरांशी व्यवहार करताना कधी विक्रेत्याचे तर कधी खरेदीदाराचे बनावट कागदपत्रे, बनावट मिळकती, बनावट मालक, बनावट सह्या, बनावट नोटरी, बनावट लोक उभे करून, बनावट पावत्या व कागदपत्रांचे दस्त हस्तांतरीत करून, फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
पोलिसांनी स्वप्नील रोहिदास शिंदे, अमोल बबन जाधव, भाऊसाहेब निवृत्ती नागदे, चंद्रशेखर हरिभाऊ शिंदे, सिराज (पूर्ण नाव माहिती नाही), दत्तू सस्ते, श्रीकांत आल्हाट, रॉकी सुदाम कांबळे, सुनील बाळू देसाई, अनिल बाळू देसाई, सुमन बाळू देसाई, ज्योती राजू कांबळे, प्रशांत प्रभाकर गायकवाड, महेश नारायण कुऱ्हे, अरुण गोविंद खरात, गणेश तकडे, गणेश रवींद्र साबळे, लखन बबन भोसले, विजय नाथा वैरागर, भारत यल्लपा फुलमाळी, रामा गंगाधर पवार, प्रेमचंद होनचंद कांबळे, वैशाली स्वामी, मीनल स्वामी, सुनील नाथा वैरागर, संतोष नामदेव कदम, साजीद रेहमुद्दीन शेख, संजय बाजीराव आल्हाट, सचिन रोहिदास शिंदे, तसेच इतर अनोळखी साथीदार, अशा 30 जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.