MLA Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar Estimate Committee Visit: अहिल्यानगरात 28 आमदारांच्या अंदाज समितीचा तीन दिवसांचा दौरा; योजनांची पाहणी, प्रशासनाची जय्यत तयारी

शासनाच्या विकासकामांचा होणार आढावा; विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची कसोटी, स्वागतासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती

पुढारी वृत्तसेवा

नगर: शासनाच्या योजनांवरील खर्च आणि विकासकामांची पाहणी करण्यासाठी गुरुवारपासून (दि. 6) तीन दिवस विधानमंडळाची 28 आमदारांची अंदाज समिती नगर दौऱ्यावर येत आहे. या समितीमधील आमदारांचे स्वागत करण्यासाठी प्रशासन ‘सज्ज’ असून, कोणताही ‘पाहुणचार’ कमी पडू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने ‘नोडल अधिकारी’ नेमून ‘आवश्यक’ खबरदारी घेतल्याची चर्चा आहे. दरम्यान, समितीद्वारे अगोदर योजनांची प्रत्यक्ष पाहणी व नंतर अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला जाणार आहे.

राज्य शासनाच्या निर्देशानुसार अंदाज समितीची रचना करण्यात आलेली आहे. यामध्ये विधानसभेचे 23 आणि विधानपरिषदेच्या 6 सदस्यांचा समावेश आहे. यातील 28 आमदारांची समिती दि. 6 ते दि. 8 ऑगस्ट अशी तीन दिवस अहिल्यानगर दौऱ्यावर आहे. त्यांच्यासोबत सचिवालयातील 10 अधिकाऱी असतील. या समितीचे नेतृत्व शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांच्याकडे सोपविले आहे.

जिल्हा परिषदेतूनही हात‘भार’!

अंदाज समितीच्या ‘स्वागता’साठी जिल्हा प्रशासनाने चोख व्यवस्था केली आहे. शासकीय विश्रामगृहातील सहा सूट सज्ज ठेवण्यात आले आहेत. तर इतर 22 आमदारांच्या व्यवस्थेची ‘जबाबदारी’ मोठ्या (आर्थिक) विभागांकडे देण्यात आल्याचीही चर्चा आहे. त्यासाठी तारकपूर परिसरातील काही हॉटेलमध्ये बुकिंग झाले आहे. त्यात नाश्ता, भोजनाच्या व्यवस्थेसाठीही नोडल अधिकारी जातीने खबरदारी घेणार आहेत. जिल्हा परिषदेनेही आपल्या विभागांच्या माध्यमातून ‘योगदान’ दिल्याची चर्चा आहे. यात आश्रमशाळा आणि ‘आरोग्य’च्या काही कर्मचाऱ्यांनी मात्र नाहक ‘झळ’ बसत असल्याने नाराजी व्यक्त केली आहे.

कार्यकर्तेही सक्रिय

या समितीतील आमदारांचे, त्यांच्या पक्षांचे नगर जिल्ह्यातही कार्यकर्ते आहेत. त्यामुळे आपल्या नेत्याच्या स्वागतासाठी तसेच त्याला ‘आवश्यक ते प्रश्न’ पुरवण्यासाठी कार्यकर्तेही आठवडाभरापासून कमालीचे ॲक्टिव्ह झाल्याचे दिसले. आमदारही कार्यकर्त्यांकडून जिल्ह्याचा लेखाजोखा जाणून घेत आहेत.

‘अपेक्षित’ उत्तरे द्यावी लागणार?

सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, जलसंधारण, लघुपाटबंधारे, कृषी, आरोग्य व शिक्षण विभागातील योजनांचा आढावा घेतला जाणार आहे. आमदारांनी आपल्या परीने जिल्ह्याचा व विषयांचा अभ्यास केला आहे. त्यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांचीही मदत घेतली आहे. त्यानुसार ‘ते’ प्रश्न विभागांकडे देण्यात आले आहेत, आज सकाळी काही प्रश्न दिले जाणार आहेत. त्यांची उत्तरे आता प्रशासनाने द्यायची आहेत. यातील बहुतांश प्रश्नांची ‘अपेक्षित’ आणि ‘अर्थपूर्ण’ उत्तरे त्या त्या विभागाला द्यावी लागणार असल्याची चर्चा आहे..

कोणत्या विभागांची होणार ‘झाडाझडती’

दरम्यान काही आमदार रात्री उशिरा मुक्कामी नगरला पोहचल्याची माहिती आहे. गुरुवारी सकाळी 9 वाजेपासून ही समिती शासकीय विश्रामगृह येथे अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेईल. महसूल, वन, अन्न व नागरी पुरवठा, वैद्यकीय शिक्षण, उद्योग व उर्जा, मनपा, सार्वजनिक बांधकाम, कृषी, ग्रामविकास, शालेय शिक्षण, नियोजन विभाग, आरोग्य विभाग, पाणी पुरवठा विभाग, प्रधानमंत्री ग्रामसडक, गृह विभाग, क्रीडा विभाग इत्यादी विभागांतर्गत योजनांच्या कामांना भेटी देऊन त्याचा आढावा घेणार आहेत. शनिवार, दि. 8 ऑगस्ट रोजी दुपारी पाच वाजता या दौऱ्यात आढळलेल्या त्रुटी, दोषांसंदर्भात अधिकाऱ्यांसमवेत बैठक होऊन त्यानंतर दौऱ्याचा समारोप होणार आहे.

समितीतील आमदार

अर्जुन खोतकर, सुधीर मुनगुंटीवार, चैनसुख संचेती, काशीराम पावरा, कृष्णा खोपडे, प्रशांत ठाकूर, बबनराव लोणीकर, दिलीप बोरसे, मंदा म्हात्रे, मनीषा चौधरी, प्रवीण दटके, नमीता मुदंडा, बालाजी कल्याणकर, किशोर पाटील, किरण सामंत, दिलीपराव बनकर, शेखर निकम, सरोज अहिरे, राहुल पाटील, कैलास पाटील, नाना पटोले, रोहित पाटील, श्रीकांत भारतीय, सदाशिव खोत, हेमंत पाटील, सतीश चव्हाण, सुनील शिंदे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT