नगर: ड्रग्ज प्रकरणात पुणे पोलिसांनी अटक केलेला स्थानिक गुन्हे शाखेचा पोलिस श्यामसुंदर गुजर पारनेर पोलिस ठाण्यात होता. त्यामुळे त्याच्या डोक्यावर कोणाचा हात होता, याबाबत अहिल्यानगरच्या पोलिस अधीक्षकांनी सगळे सत्य पत्रकारांना सांगावे, अशी अपेक्षा माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केली. त्यांनी याप्रकरणाबाबत गंभीर शंकाही उपस्थित केल्या.
ड्रग्जसारख्या गंभीर प्रकरणात नगरच्या पोलिसाला पुणे पोलिसांनी अटक केल्याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर डॉ. विखे म्हणाले, की तो पोलिस पारनेर पोलिस ठाण्यात कार्यरत होता. त्यावेळी तेथील अवैध व्यावसायिकांसोबत त्याचे संबंध होते. इतरही अनेक गंभीर प्रकरणांत त्याचा सहभाग होता. पोलिस अधीक्षकांकडे तक्रारी करून, त्याची बदली करण्याची मागणीही त्या वेळी झाली होती. मग त्याची बदली थेट नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेत झाली. म्हणजेच त्याच्या डोक्यावर कोणा तरी मोठ्या नेत्याचा हात होता. एकीकडे एसपी स्थानिक गुन्हे शाखेत इमानदार पोलिस घेतल्याचे सांगतात. मग, त्या वादग्रस्त पोलिसाला थेट एलसीबीत कुणाच्या सांगण्यावरून घेतले, हे पोलिस अधीक्षकांनी सांगावे, असे आवाहनही डॉ. विखे यांनी केले.
डॉ. सुजय विखे म्हणाले, की पोलिसांवर या प्रकरणात कुणाचा दबाव आहे, हे त्यांनी स्वतः सांगावे. मी जे प्रश्न उपस्थित करतोय, त्याचीही उत्तरे द्यावीत. अन्यथा पुढच्या आठ दिवसांत मी स्वतः पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणातील सगळ्यांची नावे उघड करीन. गंभीर गुन्हा करणारे कुणाचेही कार्यकर्ते असो, त्यांना कायद्याने शिक्षा व्हायलायच हवी.
मुलाखतीत मारला होता लाल शेरा
स्थानिक गुन्हे शाखेत अनेक दिवसांपासून ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यानंतर मेरिटवर कर्मचाऱ्यांना स्थानिक गुन्हे शाखेत नियुक्त्या देण्यात आल्या. मेरिटवर नियुक्ती देताना अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या मुलाखती घेतल्या. त्यात श्यामसुंदर गुजरच्या अर्जावर लाल शेरा मारण्यात आला होता. तरीही त्यांची एलसीबीत नियुक्ती झाली. त्यासाठी कोणाची शिफारस होती. कोणी राजकीय दाबावाचा वापर केला, याची चर्चा आता पोलिस दलात सुरू आहे.
दहा किलो ड्रग्ज कोणाच्या घरात होते: विखे
आताच्या ड्रग्ज प्रकरणात 10 किलो ड्रग्ज हे पारनेरमधील दोघांच्या घरी ठेवले गेले होते. मग ते कुणाच्या घरात होते? त्यांची नावे पोलिस का सांगत नाहीत? ज्यांच्या घरात हे 10 किलो ड्रग्ज होते, ते कुणाचे कार्यकर्ते होते? त्यांची नावे गुन्ह्यात येऊ नयेत, म्हणून पोलिस ठाण्यात कोण अर्धा तास बसून होते? हे सगळे मला माहीत आहे. परंतु, पोलिसांनीच पत्रकार परिषद घेऊन सांगावे, असेही विखेंनी स्पष्ट केले.