नगर: जिल्ह्यात औषध प्रशासनाकडून ‘मेडीकल’वर विशेष वॉच असल्याचे दिसते आहे. वर्षभरात नऊ ठिकाणी प्रशासनाने छापे टाकले असून, सुमारे 96 लाख 70 हजारांचा औषधांसह मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी सात गुन्हे दाखल केले असून, आठ आरोपींना अटक केल्याचेही पुढे येत आहे. विशेष म्हणजे, नशेसाठी वापरले जाणाऱ्या इंजेक्शन जप्तीच्या कारवाया अधिक आहेत.
जिल्ह्यात 6500 अधिकृत नोंदणीकृत मेडीकल आहेत. तर नगर शहरात 1250 मेडीकल आहेत. यातील बहुतांशी मेडीकल हे दवाखान्याशी संलग्न आहेत. जर मेडीकलमधून वाढीव दराने औषध विक्री, मुदत संपलेली औषध विक्री किंवा अन्य नियमावलीचे उल्लंघन केले जात असेल, तर संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाते. याशिवाय मेडीकल चालक हा फार्मासिस्टच असावा, त्यासाठी परवाना, नूतनीकरणही तपासले जाते. संशयास्पद औषधांचे नमुने घेऊन ते प्रयोगशाळेत पाठवले जातात, त्याच्या अहवालानंतर पुढील कारवाई ठरवली जाते. दर महिन्याला जिल्ह्यातील 15 मेडीकलची औषध प्रशासन तपासणी करत असते.
दरम्यान, आयुक्तांच्या मार्गदर्शनात औषध प्रशासनाचे शेख आणि माळी यांनी विविध ठिकाणी कारवाया केल्या आहेत. जिल्ह्यात गत वर्षभरात मेफेन्टरमाइन हे इंजेक्शन कमी रक्तदाब स्थीर करण्यासाठी वापरले जाते. हदय आणि रक्तवाहिन्यांचे कार्य सुधारून रक्तदाब वाढवण्यास मदत करते. हे इंजेक्शन शस्त्रक्रिया करताना, किंवा रुग्ण अत्यावस्थ असेल तेव्हाच गरजेनुसार दिले जाते. मात्र, त्याचा आता दुरुपयोग केला जात आहे. विशेषतः जीम करणाऱ्या युवकांना या इंजेक्शनचे वेड लागले आहे. काहीजण याची नशा म्हणूण वापर करत आहेत. या इंजेक्शनमुळे शारीरीक उर्जा वाढते, त्यामुळे थकवा न येता जास्तवेळ व्यायाम शक्य होतो. एक उत्तेजक औषध म्हणून याकडे पाहिजे जात आहे. मात्र त्याचे शरीरावर दुरगामी वाईट परिणाम होतात, प्रसंगी ब्रेन स्ट्रोक बसू शकतो, असेही जाणकार सांगतात.
या इंजेक्शनच्या विक्रीच्या वर्षभरात श्रीरामपूर आणि शिर्डीत 5 कारवाया झाल्या. औषध प्रशासनाने या ठिकाणी पोलिसांच्या मदतीने धाडी टाकून इंजेक्शन जप्त करत गुन्हे दाखल केले. तर याशिवाय नगर शहरातही तीन कारवाया झाल्या. एमआयडीसी परिसरात भ्रामक जाहीरातीतून फसवणूक केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. अशाप्रकारे वर्षभरात नऊ ठिकाणी औषध प्रशासनाने कारवाई केली. संबंधित इंजेक्शन हरियाणातून कुरीअरने बोलावले जाते. त्याची किंमत कंपनीनुसार 500 ते 1500 पर्यंत असल्याचेही समजते. दोन दिवसांपूर्वीच तोफखाना पोलिसांनी सर्व जीम चालकाना बोलावून त्या ठिकाणी असे इंजेक्शन वापरू नये, अशा सूचना केल्याचेही समजले.
आमच्याकडे वाढीव दराने औषध विक्रीच्या जास्त तक्रारी येतात. त्याची आम्ही शहानिशा करतो. त्यानंतर तशी कारवाई केली जाते. मेडीकल व्यवसाय करताना अटी व नियमांचे पालन करावे. मुदतबाह्य औषधे ठेवू नयेत, खरेदी- विक्रीची बिले जतन करावेत, शक्यतो संगणक बिलांचा वापर करावा.हुसेन शेख, सहायक आयुक्त, औषध प्रशासन