Drought Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar Drought: नगर तालुक्यात दुष्काळाचे सावट; १९ गावांना टँकरने पाणीपुरवठा, दिवाळीही चिंतेत!

खरीप पिके उद्ध्वस्त; अडीच लाख पशुधनाच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर, कौडगाव-जांब आणि आठवडसाठी टँकरचे प्रस्ताव

पुढारी वृत्तसेवा

शशिकांत पवार

नगर तालुका: नगर तालुक्यात भीषण दुष्काळामुळे खरीप पिकांची राखरांगोळी झाली असून, शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई, चारा संकट आणि हाताला काम नसल्याने ग्रामीण जनजीवन विस्कळित झाले आहे. १९ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असताना कौडगाव-जांब आणि आठवड या आणखी दोन गावांचे टँकरसाठी प्रस्ताव दाखल झाले आहेत. आगामी दिवाळी सणावरही दुष्काळाचे सावट पसरले असून, पुढील आठ ते दहा महिने कसे काढायचे याची चिंता बळिराजाला सतावत आहे.

जेऊर, बहिरवाडी, ससेवाडी आणि इमामपूर अशा गावांमध्ये टँकर सुरू असतानाही पाण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे या गावांना वाढीव टँकरची गरज भासण्याची शक्यता आहे. पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेता प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

खरीप पिकांच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. त्यात चारा आणि पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने पशुधन जगविण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. तालुक्यात गाय व म्हैसवर्गीय १ लाख ४५ हजार ६३७, तर शेळी व मेंढीवर्गीय १ लाख ९ हजार १७८ पशुधन आहे. म्हणजेच सुमारे २ लाख ५५ हजार पशुधनाच्या चारा-पाण्याचा प्रश्न पशुपालकांसमोर उभा राहिला आहे. फळबागा पाण्याअभावी धोक्यात आल्या आहेत. डोंगररांगांतील नैसर्गिक जलस्रोत आटल्याने वन्य प्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून, दुर्मिळ औषधी वनस्पती नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पीक नुकसानीचे पंचनामे पूर्णत्वाच्या मार्गावर असले, तरी शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळण्याची प्रतीक्षा आहे. शेतीतून उत्पन्न नसल्याने ग्रामीण बाजारपेठेतील उलाढाल मंदावली असून, ग्रामीण अर्थव्यवस्थेला फटका बसला आहे. शासनाने दुष्काळ जाहीर केल्यानंतर आता प्रत्यक्ष मदत तातडीने मिळावी, तसेच पिण्याचे पाणी, पशुधनासाठी चारा आणि पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत. ग्रामीण भागात दुष्काळाचे खूपच विदारक चित्र पहावयास मिळत आहे.

टॅंकर सुरू असलेली गावे!

इमामपूर, बहिरवाडी, ससेवाडी, मदडगाव, रांजणी, अकोळनेर, खांडके, भोयरेपठार, बाळेवाडी, भोयरे खुर्द, उक्कडगाव, कोल्हेवाडी, सांडवे, भातोडी, पारगाव, बाबुर्डी, जेऊर, मांडवे, चिचोंडी पाटील, तसेच कौडगाव (जांब ) व आठवड गावचे नव्याने प्रस्ताव दाखल.

शेतात पीक नाही, हातात पैसा नाही आणि डोक्यावर कर्जाचा भार आहे अशा परिस्थितीत दिवाळी साजरी करायची कशी, असा प्रश्न बळिराजासमोर आहे. सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांच्या घरात आर्थिक चिंतेचे सावट असून, तातडीच्या मदतीची अपेक्षा आहे.
संतोष भालसिंग, शेतकरी
चाराटंचाई आणि पिण्याच्या पाण्याच्या समस्येमुळे पशुपालक चिंतेत आहेत. सुमारे अडीच लाख पशुधनाच्या संगोपनासाठी प्रशासनाने तातडीने चारा व पाण्याची व्यवस्था करावी’ अन्यथा ग्रामीण भागातील पशुपालन आणि दुग्ध व्यवसायासमोर आणखी मोठे संकट उभे राहण्याची भीती आहे.
शरद तोडमल (पशुपालक)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT