Annual Plan Pudhari
अहिल्यानगर

Maharashtra District Annual Plan: अहिल्यानगर जिल्हा वार्षिक योजनेस 885 कोटींची मंजुरी

कामांना गती द्या; विलंब झाल्यास निधी वळविण्याचे विखे पाटलांचे निर्देश

पुढारी वृत्तसेवा

नगर: शासनाने 2026-27 या वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या 885 कोटींच्या अंतिम आराखड्यास मंजुरी दिली आहे. येत्या दहा दिवसांत लोकप्रतिनिधींनी कामांच्या शिफारशी सादर कराव्यात तसेच प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर दोन महिन्यांच्या आत निविदा प्रक्रिया पूर्ण करावी.अन्यथा निधी इतर विकासकामांना वळविण्यात येऊन प्रस्तावांना विलंब करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.

विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि.15) जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक झाली. आमदार सर्वश्री किशोर दराडे, विठ्ठल लंघे, अमोल खताळ, विक्रमसिंह पाचपुते, हेमंत ओगले व अक्षय कर्डिले तसेच जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, महापालिका आयुक्त यशवंत डांगे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, जिल्हा नियोजन अधिकारी दीपक दातीर उपस्थित होते. दूरदृश्य प्रणालीद्वारे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार सर्वश्री सत्यजित तांबे, विवेक कोल्हे, किरण लहामटे व काशिनाथ दाते आदी उपस्थित होते.

2026-27 या वर्षातील विद्युत विकासासाठी 55 कोटी, अपारंपरिक ऊर्जा विकासासाठी 50 कोटी, लघुपाटबंधारे व कोल्हापुरी बंधारे बांधकाम व दुरुस्तीसाठी 30.50 कोटी, रस्ते विकासासाठी 123 कोटी, तसेच ग्र्रामपंचायतींच्या जनसुविधांसाठी 29.43 कोटी, मोठ्या ग्रामपंचायतींच्या नागरी सुविधांसाठी 25 कोटी, नगरविकाससाठी 100 कोटी, यात्रास्थळांच्या विकासासाठी 10 कोटी व पर्यटन विकासासाठी 60 कोटी निधींला मंजुरी देण्यात आली आहे.

नागरिक, शेतकरी व विद्यार्थ्यांना होणारा त्रास लक्षात घेऊन ग्रामीण भागात वीज भारनियमन दुपारच्या वेळेत करण्याचे नियोजन करावे. अतिभारित रोहित्रांचा प्रश्न सोडवून कृषीपंपांना पुरेशा दाबाने वीजपुरवठा सुनिश्चित करावा, अशा सूचनाही विखे पाटील यांनी दिल्या. ग्रामीण रुग्णालयांसाठी मंजूर रुग्णवाहिकांची खरेदी प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून त्यांचे लवकरच वितरण केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी ते शनिशिंगणापूर रस्त्याच्या कामांना प्राधान्याने गती देऊन ते वेळेत पूर्ण करण्यात यावेत. शहरातील मुख्य चौकांमधील अतिक्रमणामुळे होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी नगरपालिका व पोलिस प्रशासनाने संयुक्त मोहीम राबवावी, असे निर्देश त्यांनी दिले.

दोषी कंत्राटदाराला काळ्या यादीत टाका

अहिल्यानगर-मनमाड रस्त्याचे काम रखडल्याबद्दल संबंधित दोषी कंत्राटदारावर कठोर कारवाई करून त्याला काळ्या यादीत टाकण्यात यावे. पावसाळ्यापूर्वी रस्ते वाहतुकीसाठी सुरळीत करावेत तसेच लोकप्रतिनिधींना त्यांच्या मतदारसंघातील शाळा दुरुस्ती व विकासकामांची अद्ययावत माहिती लेखी स्वरूपात उपलब्ध करून द्यावी, अशा सूचनाही विखे पाटील यांनी दिल्या.

सहा तीर्थक्षेत्रांना ‌‘क‌’ वर्गाची मान्यता

सावरचोळ (मेंगाळवाडी), ता. संगमनेर येथील श्री बिरोबा देव मंदिर, भानगाव ता. श्रीगोंदा येथील श्री भानेश्वर मंदिर देवस्थान, बेलापूर बदगी ता. अकोले येथील श्री योगी रामदास बाबा देवस्थान ट्रस्ट, काटाळवेडा ता. पारनेर येथील श्री दत्त मंदिर देवस्थान ट्रस्ट तसेच मिरजगाव ता. कर्जत येथील श्री संत सावता माळी मंदिर, महादेव मंदिर देडगाव ता नेवासा या सहा ग्रामीण तीर्थक्षेत्रांना ‌‘क‌’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यास बैठकीत मान्यता देण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT