नगर: शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याबरोबरच त्यांच्या वीज खर्चात बचत व्हावी, या उद्देशाने अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकऱ्यांच्या घरांवर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याच्या दृष्टीने पुढाकार घेण्याचे संकेत दिले आहेत.
ज्या विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यांची वसुली १०० टक्के आहे, अशा संस्थांच्या सभासद शेतकऱ्यांना या योजनेत प्राधान्य देण्याचा विचार आहे.
बँकेच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या पहिल्याच बैठकीत या विषयावर सकारात्मक चर्चा झाली असून, लवकरच याबाबत स्वतंत्र धोरण निश्चित करणार असल्याचे समजले.
जिल्हा बँकेच्या निवडणूक आणि अध्यक्षपदी डॉ. सुजय विखे पाटील आणि उपाध्यक्षपदी रणजितसिंह देशमुख यांची निवड झाल्यानंतर शुक्रवारी संचालक मंडळाची पहिली बैठक झाली. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचलित कार्यपद्धतीमुळे या बैठकीतून शेतकऱ्यांसाठी काही सरप्राईज निर्णय होतात का, याकडे साऱ्यांचे लक्ष होते.
या बैठकीत बँकेची आर्थिक स्थिती, ठेवी, कर्जपुरवठा, थकीत कर्जाबाबत चर्चा झालीच; शिवाय सौरऊर्जा प्रकल्पाबाबतही सकारात्मक चर्चा झाली. संचालकांचे म्हणणे अध्यक्ष डॉ. विखे पाटील यांनी ऐकून घेतले. यातील अडीअडचणी लक्षात घेऊनच पुढील धोरण ठरविण्याचा निर्णय झाला.
त्यासाठी शेतकऱ्यांना जिल्हा बँकेतर्फे अत्यल्प व्याजदरात कर्जपुरवठा करण्याच्या पर्यायावर विचार होणार आहे. त्यासाठी योग्य एजन्सीची नियुक्ती, व्याजदर, परतफेडीचा कालावधी आणि शासनाकडून अनुदानाची रक्कम अशा विविध बाबींचा अभ्यास केला जाणार असल्याचे समजते.
दरम्यान, बँकेच्या पहिल्याच बैठकीसाठी खा. नीलेश लंके वगळता अन्य सर्वसंचालक उपस्थित होते.
दुष्काळग्रस्तांसाठी एक कोटी
जिल्हा बँकेच्या नव्या नेतृत्वाच्या कार्यकाळाची सुरुवात सामाजिक उत्तरदायित्वाच्या निर्णयाने झाली. जिल्हा सहकारी बँक आणि बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने दुष्काळग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला एक कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्याकडे हा निधी अधिकृतपणे सुपूर्द करण्यात येणार आहे.
बँकेच्या कर्मचाऱ्यांनीही आपल्या एक दिवसाच्या वेतनातून या मदतकार्यात योगदान देण्याची भूमिका घेतली आहे. दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेकडून आर्थिक मदत करण्याची परंपरा यापूर्वीही जपली गेली आहे.
शेतकऱ्यांचे हित, बँकेची आर्थिक शिस्त आणि सामाजिक बांधिलकी या तिन्ही बाबींचा समतोल साधत अध्यक्ष सुजय विखे पाटील व उपाध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांच्या नेतृत्वातील नवनिर्वाचित संचालक मंडळाने आपल्या पहिल्याच बैठकीत दुष्काळग्रस्तांच्या मदतीचा हा निर्णय घेतला आहे.