Ahilyanagar District Bank Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar District Bank Election: अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीत समझोत्याची ‘एक्स्प्रेस’; राम शिंदेंच्या माघारीने राजकीय समीकरणे बदलली

बहुतांश जागा बिनविरोध होण्याची शक्यता; विखे-थोरातांच्या समझोत्याकडे लक्ष

पुढारी वृत्तसेवा

गोरक्ष शेजूळ

नगर: अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँक निवडणुकीत अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी सोमवारी माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या रूपाने प्रस्थापितांनी बिनविरोध विजयाचे खाते उघडले. त्याचबरोबर सोसायटी मतदारसंघातून चंद्रशेखर घुले किंवा त्यांच्या पत्नी राजश्री, बाळासाहेब थोरातांचे जावई रणजितसिंह देशमुख, डॉ. सुजय विखे पाटील, अक्षय कर्डिले, विवेक कोल्हे, प्राजक्त तनपुरे हे प्रस्थापित नेत्यांच्या पॅनलमधील उमेदवारही बिनविरोधच्या मार्गावर आहेत. सभापती राम शिंदे यांच्याशी समझोता बैठक झाल्यानंतर विस्थापितांचा उरलासुरला विरोधही मोडीत निघाल्याचे मानले जात आहे. आजपर्यंतच्या पडद्यामागील राजकीय घडामोडी पाहता बँकेची वाटचाल बिनविरोधाच्या दिशेने होत असल्याचेच स्पष्ट होत आहे.

सोसायटी मतदारसंघातील १४ पैकी बहुतांश जागा बिनविरोध होण्याच्या मार्गावर आहेत. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचा समझोता झाल्यात जमा आहे. शिवसेनेला एखाददुसरी जागा मिळेल किंवा मिळणारही नाही, अशी परिस्थिती आहे. अकोल्यात सीताराम गायकर आणि वैभव पिचड यांचे मनोमिलन झाल्याने पिचड अनुसूचित जाती-जमातीमधून बँकेत जातील, तर सोसायटी मतदारसंघातून गायकर यांची कन्या संजीवनी शिंदे किंवा कैलास वाकचौरे यांना उमेदवारी मिळेल. येथून आ. किरण लहामटे यांनी अर्ज दाखल केला असला, तरी त्यांच्याकडे बहुमताइतके ठरावच नाहीत. विकास शेटे हेही दावेदारही माजी मंत्री थोरातांच्या शब्दापलीकडे नाहीत. लहामटे यांचा विरोध मोडीत निघाल्यास अकोल्याची जागाही बिनविरोधाच्या मार्गावर आहे.

जामखेड व कर्जत तालुका सोसायटी मतदारसंघ हे कळीचे मुद्दे बनले आहेत. येथून सभापती राम शिंदे यांच्याकडे बहुमतापेक्षा अधिकचे ठराव आहेत. कर्जतमधून मंजूषा राजेंद्र गुंड, काकासाहेब तापकीर आणि जामखेडमधून सचिन घुमरे यांच्यासाठी राम शिंदे आग्रही असतील. विस्थापितांचा विरोध मोडीत काढण्यासाठी या दोन्ही जागा शिंदेंना दिल्या गेल्या, तर येथून विखे समर्थक अमोल राळेभात व अंबादास पिसाळ यांचे पुनर्वसन कुठे तरी करावे लागेल. राम शिंदे कर्जत, जामखेडच्या जागा कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाहीत. त्यामुळे राळेभात यांचे पुनर्वसन करायचे झाल्यास विखे यांच्याकडे मनीषा सुधीर राळेभात यांना महिला राखीव जागेवर संधी देण्याशिवाय पर्याय नसेल.

कोपरगाव सोसायटीतून बिपीन कोल्हे व आ. विवेक कोल्हे यांच्याशिवाय संजय शिंदे व अनिल कदम यांचे अर्ज आहेत. पण शिंदे व कदम यांच्याकडे बहुमत नाही. त्यामुळे या दोघांची मनधरणी करून कोल्हे पिता-पुत्रापैंकी एकाची बिनविरोध निवड होण्याची शक्यता बळावली आहे. ही निवड होताना आगामी राजकीय गणितही आखले जाण्याची शक्यता आहे. कोपरगावचे आमदार आशुतोष काळे गतवेळी शेतीपूरक मतदारसंघातून संचालक झाले होते. यंदाही त्यांनी याच मतदारसंघातून अर्ज दाखल केला आहे. येथून अर्ज दाखल करणारे वैभव पिचड अनुसूचित जाती-जमातीतून जाणार असल्याने काळे यांचा मार्ग मोकळा होईल. याच मतदारसंघातून राजेंद्र नागवडे, दिवंगत माजी खासदार दादा पाटील शेळके यांचे नातू अंकुश शेळके, दत्ता पानसरे, रोहिदास कर्डिले, मधुकर नवले, रत्नमाला विठ्ठलराव लंघे, बी. जे. देशमुख यांचे अर्ज आहेत. यातील आ. लंघे, रोहिदास कर्डिले, राजेंद्र नागवडे हे विखेंच्या, तर अंकुश शेळके, मधुकर नवले हे थोरातांच्या ऐकण्यातील आहेत. त्यामुळे आ. काळे यांना शेतीपूरकमधून, तर कोल्हे कुटुंबाला सोसायटी मतदारसंघातून संधीची शक्यता वर्तवली जाते.

नगर तालुक्यातून आ. अक्षय शिवाजीराव कर्डिले हेदेखील बिनविरोधाच्या मार्गावर आहेत. येथून अर्ज भरलेले प्रताप शेळके व बाळासाहेब हराळ यांचा जिल्हा परिषद निवडणुकीत निंबळक-वाळकी गट सुरक्षित करण्यावर भर असेल. विखे-थोरातांनी तसा शब्द दिला तर दोघांची माघार होऊन कर्डिले बिनविरोध होतील. पाथर्डीतून आ. मोनिका राजळे याही सोसायटी मतदारसंघातून बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जाते. येथून राष्ट्रवादीचे नेते ॲड. प्रताप ढाकणे यांचे चिरंजीव तथा ढाकणे साखर कारखान्याचे अध्यक्ष ऋषीकेश ढाकणे व त्यांचे समर्थक कडुचंद शेटे यांचे अर्ज आहेत. ढाकणे हे विस्थापितांचे नेते असून ते खा. नीलेश लंके यांच्यासोबत आहेत. लंके यांना पारनेरमधून बिनविरोध दिल्यास ढाकणे अर्ज काढून घेतील, असेही बोलले जाते.

राहाता तालुक्यातून भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे यांचा अर्ज असून त्यांच्या विरोधात एकनाथ घोगरे यांचा एकमेव अर्ज आहे. भास्कर खर्डे यांचा अर्ज असला, तरी ते विखे समर्थक आहेत. घोगरे हे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या शब्दापलीकडे नाहीत. विखे-थोरातांची सहमती पाहता घोगरे अर्ज मागे घेतील अन् सुजय विखे बिनविरोध होतील, असे चित्र आज तरी दिसते आहे. राहुरीतही भाजपचे आ. प्राजक्त तनपुरे यांच्यासह हर्ष अरुण तनपुरे यांच्याशिवाय देवळालीचे नगराध्यक्ष सत्यजित कदम, भाऊसाहेब लोंढे यांचे अर्ज आहेत. यातील कदम व लोंढे हे विखेंचा शब्द डावलतील अशी शक्यता नाही. तनपुरे कुटुंबातून प्राजक्त येणार की हर्ष यांना संधी देणार हे पाहावे लागेल.

संगमनेरमधून रणजितसिंह देशमुख सोसायटी मतदारसंघातून बिनविरोध होतील, असे चित्र आहे. येथून चित्रा गायकवाड यांचा एकमेव अर्ज त्यांच्या विरोधात आहे. राहात्यामधून डॉ. सुजय विखेंसाठी घोगरे यांची माघार, तर संगमनेरातून देशमुखांसाठी गायकवाड यांची माघार हे विखे-थोरात सहमती एक्सप्रेसला सहज शक्य असल्याचे बोलले जाते.

शेवगाव सोसायटीची जागा बिनविरोध झाल्यात जमा असून तेथून माजी आमदार चंद्रशेखर घुले, की त्यांच्या पत्नी तथा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष राजश्री घुले, याबाबतचा निर्णय सर्वस्वी घुले कुटुंबालाच घ्यायचा आहे. श्रीरामपूरच्या जागेवर लढत होणार की समझोता हे पाहावे लागेल. येथून नगराध्यक्ष करण ससाणे यांनी सोसायटी मतदारसंघातून अर्ज भरला आहे. माजी आमदार भानुदास मुरकुटे रिंगणाबाहेर असल्याने त्यांचा मार्ग सोपा झाल्याने मानले जात असतानाच मुरकुटे समर्थक माजी सभापती सोपान राऊत, सोन्याबापू शिंदे, रणजित बनकर या इच्छुकांमुळे श्रीरामपुरात घमासान होण्याची चिन्हे आहेत. मुरकुटे व ससाणे हे दोघेही तुल्यबळ प्रतिस्पर्धी मानले जातात.

बिगरशेती मतदारसंघात चुरस दिसत असली तरी येथून डॉ. सुजय विखे पाटील यांच्या साक्षीने उमेदवारी दाखल केलेले आ. संग्राम जगताप यांचे बंधू सचिन जगताप यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. या मतदारसंघात प्रशांत गायकवाड, नंदकिशोर औताडे, वसंत लोढा, दत्ता पानसरे, रावसाहेब रोहोकले गुरुजी, प्रतापसिंह पाचपुते, प्रतीभा पाचपुते, शरद झोडगे, आ. वैभव पिचड, बाळासाहेब तापकीर यांचे अर्ज आहेत. मात्र हे सर्वच इच्छुक विखे-थोरात-जगतापांपुढे नाहीत, असेही चित्र आहे. महिला राखीव दोन जागांपैंकी एक जागा सभापती शिंदे गटाला मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. तेथून मंजूषा गुंड यांना उमेदवारी मिळाल्यास दुसरी जागा विखे समर्थक मनीषा सुधीर राळेभात यांना मिळणार असल्याची चर्चा आहे. महिला मतदारसंघातून अर्ज दाखल केलेल्यांमध्ये अनुराधा नागवडे, सुप्रिया वसंत झावरे, अर्चना पानसरे, मीनाक्षी साळुंके, प्रणोती जगताप, अनुराधा कुंडलिक जगताप, सुवर्णा रोहिदास कर्डिले, प्रतीभा बबन पाचपुते, रत्नमाला लंघे, हर्षदा काकडे, सुनीता भांगरे, गीतांजळी शेळके, विजयालक्ष्मी फाळके यांचा समावेश आहे. यातील गीतांजली शेळके यांचे पुनर्वसन होणार की कसे हे पाहावे लागेल. उर्वरित इच्छुक महिला या विखे-थोरातांचा शब्द प्रमाण मानणाऱ्यापैंकीच मानले जाते.

अनुसूचित जाती जमातीमधून वैभव पिचड यांची उमेदवारी निश्चित असून येथून अर्ज दाखल करणारे अमित भांगरे, आ. किरण लहामटे या दोघांमागे असलेले पाठबळ पाहता ते विखे-थोरातांच्या ऐकण्यातीलच आहेत. त्यामुळे ही जागाही बिनविरोध होण्याचीच शक्यता अधिकची मानली जाते. ओबीसी जागेतून कोणाला संधी द्यायची असा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. करण ससाणे, अंकुश रावसाहेब शेळके, प्रतापसिंह पाचपुते, प्रतीभा पाचपुते, प्रशांत गायकवाड, आ. विठ्ठलराव लंघे, राहुल जगताप, सत्यजित कदम, मंजूषा गुंड यांचे अर्ज आहेत. सोसायटी आणि बिगरशेतीतून आऊट झालेले भानुदास मुरकुटे यांनी स्वत: व नातू नीरज मुरकुटे यांचा कारखान्याच्या संचालक मंडळातून अर्ज भरला आहे. मुरकुटे नातवासाठी आग्रही आहेत, पण प्रस्थापित अनुकूल नाहीत. दरम्यान, ससाणे सोसायटीतून जातील. लंघे, गायकवाड, राहुल जगताप किंवा पाचपुतेंपैंकी एक नाव अंतिम मानले जाते, पण त्यासाठी विखे-थोरातांना कसरत करावी लागेल. विमुक्त जाती-जमाती मतदारसंघातून बाळासाहेब थोरात समर्थक गणपत सांगळे यांची उमेदवारी निश्चित असली तरी ते बिनविरोध होणार की लढत देऊन बँकेत जाणार हे पाहावे लागेल. त्यांच्या विरोधात ऋषीकेश ढाकणे, अरुण मुंडे यांचे अर्ज आहेत. यातील मुंडे हे विखे-थोरातांचा ऐकतीलही पण ढाकणेंचे काय हा प्रश्न आहे.

पारनेरमध्ये लंके विरोधात राहुल शिंदे

पारनेर सोसायटी मतदारसंघात कमालीची चुरस पाहायला मिळणार आहे. पारनेरमधून खा. नीलेश लंके, गीतांजली शेळके व भाजप तालुकाध्यक्ष राहुल शिंदे यांचे अर्ज आहेत. यातील शेळके माघार घेतील, तर लंके-शिंदे अशी लढत होईल असे मानले जाते. राहुल शिंदे हे विखेंचे कट्‌टर आहेत. खा. लंके हे जिल्हा बँकेत येऊ नये यासाठी विखे हे शिंदे यांच्या रूपाने प्रतिष्ठा पणाला लावतील. त्याच वेळी खा.लंके हे थोरातांच्या शब्दाखातर ऐकतील की विखे विरोध कायम ठेवत लढतील हे २२ तारखेलाच स्पष्ट होईल. तोपर्यंत खल सुरूच राहील, असे चित्र आहे.

श्रीगोंद्यातून जगताप विरुद्ध कोण?

श्रीगोंदा सोसायटी मतदारसंघातून माजी आमदार राहुल जगताप यांनी प्रस्थपितांविरोधात उमेदवारी दाखल केली आहे. जगताप यांच्या विरोधात राजेंद्र नागवडे, अण्णासाहेब शेलार, प्रतापसिंह पाचपुते, प्रवीणकुमार नाहाटा व दत्ता पानसरे यांचे अर्ज आहेत. मात्र येथील सोसायटीचे सर्वाधिक ठराव राहुल जगताप यांच्या बाजूने असल्याने नागवडे लढणार की पाचपुते हे पाहावे लागेल. पाचपुते यांना इतर मागासवर्गातून उमेदवारी दिल्यास नागवडे हे जगताप यांच्याविरुद्ध लढतील असे मानले जाते. नागवडे व जगताप हे दोघेही राष्ट्रवादीत आहेत. त्यामुळे या जागेचा तिढा थेट उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या कोर्टात जाण्याचीच शक्यता अधिक मानली जाते. नाहाटा व पानसरे, शेलार यांचे अर्ज असले तरी त्यांच्याकडे त्या तुलनेत ठराव नाहीत.

अंतरात्म्याचा आवाज!

महाराष्ट्र विधान परिषदेचा सभापती म्हणून माझ्यावर असलेल्या घटनात्मक पदाची प्रतिष्ठा आणि निष्पक्षता जपणे ही माझी जबाबदारी आहे. तसेच व्यापक परिस्थितीचा, सर्वांगीण बाबीचा शांतपणे विचार केल्यानंतर माझ्या अंतरात्म्याच्या आवाजाने मला असे सांगितले, की अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करू नये. असा मी निर्णय जाहीर करत आहे. माझा हा निर्णय कोणत्याही राजकीय दबावातून किंवा व्यक्तिगत कारणातून घेतला नाही, तर राजकीय महत्त्वाकांक्षेपेक्षा घटनात्मक पदाची प्रतिष्ठा सर्वोच्च आहे, हे मी मानणारा कार्यकर्ता आहे. हा निर्णय माझ्या अंतरात्म्याचा आवाज व राजकीय रणनीतीचा भाग आहे. त्यान्वये विचारपूर्वक हा मी निर्णय घेतलेला आहे.

एक कॉल आला आणि रंग उतरला..

राम शिंदे यांना काल सोमवारी जिल्हा बँकेसाठी उमेदवारी अर्ज भरायचा होता. त्यासाठी कर्जत आणि जामखेडच्या कार्यकर्त्यांना नगरला बोलावले होते. शिंदे यांच्या संपर्क कार्यालयात मंडप टाकण्यात आला होता. कार्यकर्त्यांच्या अल्पोपहाराची सोय केली होती. ठरल्याप्रमाणे सकाळी 10 च्या दरम्यान विशाल गणेशाचे दर्शन घेऊन राम शिंदे अर्ज भरण्याच्या तयारीत होते. मात्र, अकराच्या सुमारास त्यांना ‘एक कॉल’ आला आणि त्यानंतर त्यांच्या चेहऱ्याचा रंग उतरला. काही क्षणात ते पुन्हा संपर्क कार्यालयात पोहचले. तोपर्यंत कार्यकर्त्यांची गर्दी वाढत होती. अशा वेळी राम शिंदे यांच्या मनात मात्र घालमेल सुरू होती. कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून, ‘आपला निर्णय कसा सांगायचा, त्यांची समजूत कशी काढायची,’ या विचारांनी त्यांना शब्दही फुटत नव्हते. अशा वेळी त्यांनी आपल्या अंतरात्म्याचा आवाज कागदावर लिहून तो अक्षरशः जड अंतःकरणाने कार्यकर्त्यांसमोर वाचून दाखवला. त्यानंतर काही क्षणांत, अनावर झालेल्या भावना लपवत ते आपल्या दालनात पोहचले. या वेळी बाहेर एकच सन्नाटा पसरला. कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे धाव घेतली. ‘साहेब, निवडणूक लढवायचीच.. सीएमला फोन लावा.. आपल्याला जिल्ह्यातून जाणीवपूर्वक त्रास दिला जातोय.. आपल्याला विचारात घेतलेले नाही... तुम्ही थांबू नका.. आमच्यासाठी तरी अर्ज भरा... अशा शब्दात कार्यकर्ते विनवणी करत होते. काही कार्यकर्ते तर ढसाढसा रडत होते. या वेळी शिंदे हेही या निर्णयाने प्रचंड अस्वस्थ दिसले. त्यांना शब्द फुटत नव्हते. त्यांना तातडीने पाणी देण्यात आले. कार्यकर्त्यांनीही ‘त्यांना थोडा वेळ एकांतात राहू द्या,’ असे सांगून ॲन्टीचेंबरमध्ये बसवले. काही वेळाने पुन्हा कार्यकर्त्यांनी शिंदे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिंदे यांनी आपण विचारपूर्वक निर्णय घेतलेला आहे, असे सांगून त्यात बदल होणार नाही, ही भूमिका जाहीर केली...

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT