गोरक्ष शेजूळ
नगर: आशिया खंडात नावाजलेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. ठरावाची प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे. लवकरच निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे. मात्र 1958 ते 2026 या 68 वर्षाची गौरवशाली परंपरा लाभलेल्या आणि शुन्यातून तब्बल 11 हजार कोटींच्या ठेवींपर्यंत बँकेला पोहचवणाऱ्या सहकारातील जुन्या-नव्या नेत्यांच्या योगदानाला विसरून चालणार नाही. आगामी निवडणुकीतही यातील काही नेत्यांच्या दुसऱ्या, तिसऱ्या पिढीतील राजकीय वारसदार बँकेत संचालक पदावर पहायला मिळू शकतात.
सन 1957 च्या दरम्यान जिल्हा बँकेची स्थापना झाली होती. सुरुवातीला माणिक चौकात बँकेचे कार्यालय असल्याचे जुणेजानते लोकं सांगतात. दि. 1 मे 1958 रोजी बँकेचा कारभार तेथून सुरू झाला. त्यानंतर बँकेने 1964 मध्ये अंदाजे पाच लाख रुपये खर्चून स्वतःची जागा घेतली आणि त्यावर कार्यालय उभे केले. त्या ठिकाणाहून बँकेचा नवा कारभार सुरू झाला. त्यावेळी केंद्रात आणि राज्यात काँग्रेसचे सरकार होते. तर मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि सहकार मंत्री म्हणून बाळासाहेब भारदे होते, असेही सांगितले जाते. दरम्यान, शेतकऱ्यांची बँक म्हणून जिल्हा बँकेकडे पाहिले जात होते. मात्र, जसा जसा काळ पुढे गेला, तशी बँकेची व्याख्याही बदलताना दिसली.
विखे, थोरात, घुले, गडाखांचे वर्चस्व
बँकेच्या 1958 ते 2026 या कालावधीत पंचवार्षिक निवडणूक सोडून, साधारणतः 41 वेळा अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी निवड प्रक्रिया घेण्यात आल्या. यामध्ये सहकारातील ‘त्या’ 24 नेत्यांना आलटून पालटून अध्यक्ष पद मिळाले. यामध्ये विठ्ठलराव विखे पाटील, भाऊसाहेब थोरात, मारुतीराव घुले, यशवंतराव गडाख यांनीच बराच काळ बँकेवर आपले वर्चस्व ठेवल्याचे दिसले.
दुसऱ्या फळीतही मिळाली संधी
यशंवतराव गडाख यांचे सुपुत्र शंकरराव गडाख यांनी बँकेचे अध्यक्षपद भूषवले. त्यापाठोपाठ मारुतीराव घुले यांचे सुपुत्र चंद्रशेखर घुले यांनाही बँकेचे अध्यक्षपद मिळाल्याचे दिसले. मात्र, पद्मश्री विठ्ठलराव विखे यांच्यानंतर पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांनी बँकेत रस दाखवला नाही. त्यांचे नातू राधाकृष्ण विखे पाटील यांना एकदा उपाध्यक्षपद व त्यानंतर अध्यक्षपद भूषवण्याची संधी मिळाल्याचे इतिहास सांगतो.
राजळे, मुरकुटे, नागवडे, तनपुरे जगतापांना हुलकावणी?
सहकारमहर्षि भाऊसाहेब थोरात हे अनेक वर्षे बँकेचे अध्यक्ष होते. मात्र, त्यांचे सुपूत्र माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी या पदात मन गुंतू दिले नाही. सत्ता असुनही त्यांनी इतरांना संधी दिली. याशिवाय, मोनीका राजळे, भानुदास मुरकुटे, अरूण तनपुरे, राहुल जगताप, राजेंद्र नागवडे यांच्या नावाची अनेकदा चर्चा झाली, मात्र शेवटच्या क्षणी त्यांना अध्यक्षपदाने हुकलावणी दिल्याचे बोलले जाते.
उपाध्यक्षपदावर संधी
उपाध्यक्ष पदावर रोहमारे, आव्हाड, देशमुख, होंडे, भगत, सोले, निसाळ, म्हस्के, नवले, पाचपुते, नागवडे, रुपवते, गायकर, देशमुख, राजळे, वाघ आदींच्या निवडी झाल्याचे दिसले.
आतापर्यंत अध्यक्ष
मोतीलाल फिरोदिया (1958-63)
के. बी. रोहमारे (1963-64)
एस. वाय. पाटील (1964-65)
भाऊसाहेब थोरात (1965-68)
विठ्ठलराव विखे (1968-70)
के. बी. हारदे (1970-71)
विठ्ठलराव विखे (1971-73)
भाऊसाहेब थोरात (1973-77)
मारुतराव घुले (1977-79)
डी. एस. रोहमारे (1979-80)
के. आर. हराळ (1980-81)
बी. एम. हांडे (1981-84)
रावसाहेब साबळे (1984-86)
मारुतीराव घुले (1986-91)
एम. डी. शेळके (1991-92)
ए. यू. निंबाळकर, (1992-93)
यशवंतराव गडाख (1993-95)
भाऊसाहेब थोरात (1995-97)
यशवंतराव गडाख (1999-२००५)
राधाकृष्ण विखे पाटील (2005-06)
शंकरराव गडाख (2007-08)
शिवाजीराव कर्डिले (2008-09)
पांडुरंग अभंग (2009-11)
बाजीराव खेमनर (2011-15)
सीताराम गायकर (2015-20)
उदय शेळके (2021-2023)
शिवाजीराव कर्डिले (2023-25)
चंद्रशेखर घुले (2025-2026)
एमडी रावसाहेब वर्पेंचे एक तप पूर्ण
बँकेत आतापर्यंत 24 अध्यक्ष बदलले, मात्र गत 12 वर्षात मुख्य कार्यकारी अधिकारी मात्र बदलले नाहीत. 2014 ते 2026 या कालावधीत रावसाहेब वर्पे हेच ‘सीईओ’ म्हणून बँकेचा प्रशासकीय कारभार हाकत आहेत. त्यांच्यासारखा दीर्घ ‘अनुभवी ’ पर्याय नसल्याने आजही त्यांच्याकडेच पदभार आहे. यापूर्वी जी.के. पाटील यांनी 1967-1983 पर्यंत दोन टप्प्यात सर्वाधिक 16 वर्षे एमडी म्हणून बँक पाहिली होती. त्यांचा विक्रम वर्पे मोडण्याच्या तयारीत आहेत.