Ahilyanagar Truck Robbery Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar Truck Robbery: देहरे टोल नाक्याजवळ ट्रक लुट प्रकरण उघडकीस, 35 लाखांचा मुद्देमाल जप्त

ट्रकचालक-क्लिनरचे हातपाय बांधून गव्हाच्या गोण्या लुटणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद

पुढारी वृत्तसेवा

नगर: नगर - मनमाड रस्त्यावरील देहरे टोल नाक्याजवळ ट्रकचालक व क्लिनरच्या हात पाय बांधून 9 लाख 67 हजारांच्या 953 गोणाऱ्या लुटणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने जेरबंद केली. त्याच्याकडून गव्हाच्या 475 गोण्या व मालट्रक असा 35 लाख 40 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

अर्जुनसिंग नारायणसिंग सरदार (वय 41), सागरसिंग गुरजंदसिंग सरदार (वय 44, दोघे रा. कोलारस, जि. शिवपुरी, मध्यप्रदेश), कल्ला शब्बीरा कोहरी (वय 25, रा. कोलारस, जि. शिवपुरी, मध्यप्रदेश), रतीलाम मदनलाल कोहरी (वय 40, रा. सबालगड, जि. मुरैना, मध्यप्रदेश) असे आरोपींची नावे आहेत.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, नगर - मनमाड रस्त्यावरील देहरे टोल नाका येथे 27 जानेवारी रोजी रात्री मालट्रक चालक व क्लिनरचे हात पाय बांधून पाच ते सहा जणांनी मालट्रकमधील गव्हाच्या गोण्या दुसऱ्या ट्रकमधून भरून चोरून नेल्या. या लुटारूंनी ट्रकचालक जगदीश चतुर्भुज माळी (रा. मंदसौर, मध्यप्रदेश) याला व क्लीनर ला पाथर्डी तालुक्यातील निवडुंगे शिवारात सोडून दिले होते. त्यानंतर 28 जानेवारीला माळी याने एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याने पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना गुन्ह्याची उकल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार कबाडी यांनी पोलिस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, संदीप मुरकुटे, महादेव गुट्टे, पोलीस अंमलदार शाहिद शेख, गणेश धोत्रे, विष्णु भागवत, विजय पवार, दिपक घाटकर, फुरकान शेख, राहुल डोके, अमृत आढाव, बाळासाहेब गुंजाळ, योगेश कर्डिले, विशाल तनपुरे, रमिझराजा आतार, प्रशांत राठोड, अरुण मोरे, भगवान धुळे, उत्तरेश्वर मोराळे यांची तीन वेगवेगळी पथके तयार करून आरोपीच्या शोधाकामी रवाना केले.

पोलिस पथकास गोपनीय माहिती मिळाली की, वरील अर्जुनसिंग सरदार (रा. कोलारस, जि. शिवपुरी) व त्याच्या साथीदारांनी केली आहे. पोलिस पथकाने आरोपींचा मध्यप्रदेश येथे शोध सुरू केला. त्यानंतर आरोपी शिवपुरी (मध्यप्रदेश) येथून पुणे या ठिकाणी जाणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने आरोपींच्या ट्रकचा पाठलाग करून अरणगाव (अहिल्यानगर) परिसरामध्ये ताब्यात घेतली. ट्रकमध्ये अर्जुनसिंग सरदार, सागरसिंग सरदार हे दोघे मिळून आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता साथीदार कल्ला कोहरी, रतिलाम कोहरी यांच्या साथीने गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्यांनाही ताब्यात घेण्यात आले. आरोपींकडून 10 लाख 40 हजारांच्या 475 गव्हाच्या गोण्या व 25 लाखांचा मालट्रक असा 35 लाख 40 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. पुढील तपासाकामी आरोपींना एमआयडीसी पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT