नगर: बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणात आम्हाला नाहक बदनाम केले जात असल्याची खंत व्यक्त करत गेल्या आठवड्यात कामकाज बंद ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांनी काल बुधवारी मात्र पुन्हा नियमितपणे दिव्यांग तपासणी केली. काल 650 पेक्षा अधिक नागरीकांची दिव्यांग तपासणी करून पुढील कार्यवाही करण्यात आली.
जिल्ह्यात काही दिवसांपासून बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे. याचे धागेदोरे जिल्हा रुग्णालयासोबत जोडले जात आहे. मात्र, काही वैद्यकीय अधिकाऱ्यांना ही बाब खटकल्याने त्यांनी गेल्या बुधवारच्या नियमित दिव्यांग तपासणीवर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे अनेकांना माघारी परतावे लागले आहे.
दरम्यान, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांशी समन्वय साधल्यानंतर हा संप दुसऱ्याच दिवशी मागे घेण्यात आला. त्यामुळे काल बुधवारी दिव्यांग तपासणी सुरू असल्याचे पहायला मिळाले.
सकाळपासूनच लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या गर्दीमुळे प्रशासनाचीही तारांबळ उडाल्याचे दिसले. त्यामुळे दिवसभराची ओपीडी देखील 650 च्या पुढे गेल्याची दिसली. डॉ. घोगरे यांच्या मार्गदर्शनात जिल्हा दिव्यांग मंडळाचे डॉ. पाठक, डॉ. संदीप कोकरे, डॉ. प्रशांत तांदळे, डॉ. ज्योती शिंदे, डॉ. सुप्रिया सोनवणे, डॉ. सोनाली बांगर, डॉ. कराळे आदींच्या टीमने दिवसभर दिव्यांग तपासणी करत त्यांच्या प्रमाणपत्रासह अन्य बाबींविषयी कार्यवाही केल्याचे दिसले.
दरम्यान, जिल्हा रुग्णालयाने तपासणीसाठी येणाऱ्या दिव्यांगांना सन्मानजनक वागणूक देतानाच आवश्यक त्या सुविधा द्याव्यात, असाही सूर आळवला जात होता.