Ahilyanagar Andaj Samiti Visit Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar Andaj Samiti Visit: अंदाज समितीचा ‘अंदाज’ आला? शासकीय पाहुणचारासोबतच आज निळवंडे पर्यटन

समितीविषयी नागरिकांमध्ये वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत.

पुढारी वृत्तसेवा

नगर: प्रशासनासह संपूर्ण जिल्ह्याला उत्कंठा लागलेली ‘अंदाज समिती’ अखेर गुरुवारी (दि. ६) अहिल्यानगरमध्ये दाखल झाली. प्रशासनानेही या समितीचा योग्य ‘अंदाज’ अखेर बांधलाच. आता या समितीचा यथोचित ‘पाहुणचार’ सुरू केला असून, त्यासाठी नेमलेले संपर्क अधिकारीही त्यांना काही कमी पडू नये याची काळजी घेताना दिसले. तसेच त्यांना ‘आवश्यक’ माहितीही पुरवली जात होती.

गुरुवारी दिवसभर या समितीने अधिकाऱ्यांसमवेत मॅरेथॉन बैठका घेतल्या, शुक्रवारी ही समिती थेट भंडारदरा परिसरातील ‘निळवंडे’ दौऱ्यावर जाणार आहे. आता त्या ठिकाणी समिती कामांची ‘पाहणी’ करणारच! पण पर्यटनाचीही पर्वणी साधणार का, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

समितीविषयी नागरिकांमध्ये वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. ही समिती नेमकी काय साध्य करणार, याविषयी शंका व्यक्त केल्या जात आहेत. मात्र दुसरीकडे प्रशासनाची धावपळ सुरू होती. यामध्ये अनेक विभाग ‘रडार’वर असल्याने त्यांच्याकडून ‘अर्थपूर्ण’ तयारी सुरू असल्याचेही कानावर येत होते. काही विभागप्रमुखांनी तर ‘25-25 देऊन टाकले!’ अशी माहिती खासगीत दिली; तर काहींनी ‘आमच्याकडे फक्त ‘हॉटेल’ व्यवस्था आहे, बाकीचं काही नाही,’ असे स्पष्ट केले.

गुरुवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास समितीचे अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर हे शासकीय विश्रामगृहावर पोहचले. त्यानंतर आमदार किशोर पाटील, आ. काशीराम बावरा, आ. श्रीकृष्णा खोपडे, आ. मंदा म्हात्रे, आ. मनीषा चौधरी, आ. शेखर निकम, आ. कैलास पाटील, आ. सदाभाऊ खोत आदी टप्प्याटप्प्याने तेथे पोहचले. तेथेच ‘काही महत्त्वाच्या गाठीभेटी’ झाल्या.

त्यानंतर समिती जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीसाठी रवाना झाली. दुपारी अडीच वाजता जेवणाची सुटी झाली. विश्रामगृहावर शाही शाकाहारी जेवणानंतर साडेतीनच्या सुमारास बैठक पुन्हा सुरू झाली. सायंकाळी सातपर्यंत ही बैठक सुरूच होती. बैठक संपल्यानंतर आमदार खोतकर वगळता अन्य सर्व आमदार खासगी हॉटेलकडे रवाना झाल्याचे सूत्रांकडून समजले. त्याच ठिकाणी त्यांची ‘व्यवस्था’ करण्यात आली होती.

आजचे नियोजन काय?

शुक्रवारी ही समिती ‘निळवंडे’च्या कामाची, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या काही रस्त्यांचीही पाहणी करणार असल्याचे सूत्रांकडून समजते. तसेच समिती शनिशिंगणापूर व शिर्डी दर्शनही करणार असल्याचे समजले.

अनेक आमदारांनी फिरवली पाठ

अंदाज समितीत नियुक्ती असलेले सुधीर मुनगुंटीवार, रोहित पाटील, नाना पटोले यांच्यासह तब्बल १८ आमदार पहिल्या दिवशी तरी या समितीसोबत दिसले नाहीत. यातील दहापेक्षा जास्त आमदारांनी ‘निरोप’ पाठवून येणार नसल्याचे कळवल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे ‘त्या’ संपर्क अधिकाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास टाकल्याचे समजते. काही आमदारांची नाराजी समोर आल्याने त्यांचा ‘प्रोटोकॉल’ही अचानक बदलल्याचीही चर्चा आहे.

आमदारांच्या दिमतीला..

प्रशासनाकडून २७ आमदारांच्या दिमतीला २७ अधिकाऱ्यांचा ‘प्रोटोकॉल’ लावण्यात आला आहे. त्यांच्याकडे आमदारांची हॉटेल व्यवस्था, नाश्ता, जेवण तसेच प्रवासाचीही जबाबदारी सोपविण्यात आल्याचे समजते. तसेच, शासकीय विश्रामगृहात थांबलेले आमदार खोतकर यांच्या व्यवस्थेकडे कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत जाधव स्वतः लक्ष देत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT