नगर: लिपिक संवर्ग कृषी कर्मचारी संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी गुरुवारपासून कामबंद आंदोलन सुरु केले. यानिमित्ताने कर्मचार्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.
सुधारित आकृतिबंधामध्ये लिपिक संवर्गीय अधिकारी कर्मचार्यांचा आकृतिबंध आयुक्तालय ते क्षेत्रिय कार्यालय स्तरावरील कोणतेही पद कमी न करता संघटनेने सुचवलेल्या किफायतशीर व आर्थिक बचतीच्या प्रस्तावास अंतिम मान्यता देण्यात यावी. (Latest Ahilyanagar News)
लिपिक संवर्गातील पदोन्नती स्तर कमी करण्यासाठी सुधारित आकृतिबंधामध्ये सहाय्यक अधीक्षक पद सुधारित मागणीनुसार कक्ष अधिकारी गट ब कनिष्ठ या पदांमध्ये समाविष्ट होण्याबाबत व पदनामात बदल करण्यात मान्यता द्यावी, लिपिक संवर्गीय अधिकार्याचे सुधारित सेवा प्रवेश नियम तयार करावे, लिपिक संवर्गीय प्रति नियुक्तीची पदे चिन्हांकित होऊन त्यास मान्यता देण्यात यावी.
वरिष्ठ लिपिक पदे 100 टक्के पदोन्नतीने भरण्याबाबत सेवा प्रवेश नियमांमध्ये बदल करण्यात यावा, सहाय्यक प्रशासन अधिकारी हे पद 75 टक्के पदोन्नतीने व 25 टक्के सरळ सेवेने भरण्याबाबत सेवा प्रवेश नियमांमध्ये बदल करण्यात यावा आदी विविध मागण्यांसाठी शासनदरबारी निवेदने दिले. आंदोलनही केले. परंतु अद्याप शासनाने याबाबत निर्णय घेतला नसल्याच्या निषेधार्थ कृषी कर्मचारी संघटनेने सोमवारपासून लेखनी बंद आंदोलन केले. या आंदोलनाची दखल घेतली नसल्याने गुरुवारपासून कामबंद आंदोलन सुरु केले आहे.
या आंदोलनात राज्य कृषी विभाग लिपिक वर्गीय संघटनेच्या अहिल्यानगर शाखेचे जिल्हाध्यक्ष आकाश बिल्ला, उपाध्यक्ष स्वप्नील खडामकर, सचिव दत्तात्रय महामुनी यांच्यासह युनुस बेग, विजयकुमार शिंदे, अमित डाके, स्वप्नील पाटोळे, गजानन अकोलकर, मयुरी कडे, जयश्री चव्हाण, सोनाली पवार आणि संघटनेचे सभासद सहभागी झाले आहेत.