Aditya Thackeray Parner Visit Pudhari
अहिल्यानगर

Aditya Thackeray Parner Visit: सरकारकडे आमदार-खासदार विकत घेण्यासाठी खोके, शेतकऱ्यांसाठी मात्र धोके: आदित्य ठाकरे

पारनेरच्या दुष्काळी दौऱ्यात राज्य सरकारवर हल्लाबोल; शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली पीक पाहणी, शेतकरी मदत केंद्राचे उद्घाटन

पुढारी वृत्तसेवा

पारनेर: आमदार-खासदार विकत घ्यायला सरकारकडे खोके आहेत. मात्र, शेतकऱ्यांसाठी फक्त धोके आहेत, असा घणाघात शिवसेनेचे युवा नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारव केला. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पारनेरचा दुष्काळी दौरा करत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली. यावेळी पारनेर येथे शेतकरी मदत केंद्राचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

यावेळी आमदार अंबादास दानवे, शिवसेनेचे (उबाठा) जिल्हाध्यक्ष राजेंद्र दळवी, उपजिल्हाप्रमुख डॉ. भास्कर शिरोळे, तालुकाप्रमुख श्रीकांत पठारे, युवा सेनेचे तालुकाध्यक्ष नीलेश खोडदे, संतोष साबळे, सखाराम उजगरे, डॉ. पद्मजा पठारे, सुनीता मुळे, संतोष मोडवे, बाबा रेपाळे आदी पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते. ठाकरे म्हणाले, मागच्या वर्षी अतिवृष्टी झाली तेव्हा मुख्यमंत्र्यांनी ३२ हजार कोटींचं पॅकेज घोषित केलं होतं. त्यातला एक रुपया तरी कोणाच्या खात्यात आला का? कर्जमाफी जाहीर केली, पण अटी-शर्ती, केवायसी, कागदपत्रे यातच शेतकरी अडकला.

मी नऊ जिल्ह्यांचा दौरा केला. दोन-तीन गावांत फक्त दहा नावं आली, त्यातल्याही तीन-चार लोकांचीच कर्जमाफी येणार आहे. बाकीच्यांचं काय? दिवाळी गोड करू, म्हणून ५ हजार रुपये दिले, पण ५ हजारांत ट्रॅक्टरचा हप्ता भरणार का, मुलांची फी भरणार का? बँकेच्या नोटिसा थांबल्या का? लाडकी बहीण योजना आणि नमो शेतकरी योजनेवर बोलताना ते म्हणाले, अनेक गावांमध्ये मला निवेदने देण्यात आली. हजारो महिलांना योजनेतून काढलं जात आहे. केंद्र सरकारकडून येणारे पैसेही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत.

गेल्या चार-पाच वर्षांत पक्षातून अनेक लोक निघून गेले, तरीही शिवसेनेची ताकद तशीच आहे, वाढत चाललेली आहे. ती ताकद आता शेतकऱ्यांसोबत उभी राहिली पाहिजे. राजकारणात आपण जिंकत असतो, हरत असतो, पुन्हा जिंकू. पण हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलेलं ब्रीद वाक्य म्हणजे ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण, हीच खरी आपली ताकद आहे, असे ठाकरे म्हणाले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कर्जमाफीचा दाखला देताना ते म्हणाले, आपलं सरकार आल्या आल्या उद्धव साहेब मुख्यमंत्री झाल्या झाल्या नागपूरच्या अधिवेशनात त्यांनी कर्जमाफी जाहीर केली होती. तेव्हा निवडणुका तोंडावर नव्हत्या. कुठल्याही शेतकऱ्याने निवेदन दिलं नव्हतं.

पण त्यांचा शब्द होता, तो त्यांनी पाळला होता. तोच आपला शब्द आहे, तोच आपला धर्म आहे.असे यावेळी ठाकरे म्हणाले. ही परिस्थिती केवळ पारनेरची नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रात, प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात आहे. आणि ही परिस्थिती लवकर बदलणारी नाही. विधानसभेत, विधानपरिषदेत, लोकसभेत, राज्यसभेत आवाज उठवायचाच आहे. पण आज सुरू केलेलं हे शेतकरी मदत केंद्र हा आवाज मुख्यमंत्र्यांपर्यंत, शासन दरबारी पोहोचवायला एकच आवाज पुढे येऊ शकतो, तो म्हणजे शिवसेनेचा, असेही ठाकरे म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT