धर्मांतर व लव्ह जिहाद विरोधात कडक कायदा करावा: आ. जगताप Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar: धर्मांतर व लव्ह जिहाद विरोधात कडक कायदा करावा: आ. जगताप

शहरात हिंदू समाजाचा जनआक्रोश मोर्चा

पुढारी वृत्तसेवा

नगर: भारतात आजपर्यंत कोणत्याही धर्मातील एकाचेही हिंदू धर्मात बळजबरीने धर्मांतर झालेले नाही. हिंदू समाज आज धर्मांतरामुळे असुरक्षित आहेत. धर्मांतर प्रकरणी केवळ मोर्चे काढून उपयोग नाही तर कोणत्याही हिंदूचे धर्मांतर होणार नाही यासाठी प्रत्येकाने जागरूक राहावे.

याप्रकरणी सरकारने तातडीने धर्मांतराच्या विरोधात तसेच लव्ह जिहाद विरोधात कडक कायदा आणावा, अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी केली. तसेच बेकायदेशीरपणे उभारलेल्या धार्मिक स्थळांवर शहानिशा करून बुलडोझर फिरवला पाहिजे, अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी या वेळी केली. (Latest Ahilyanagar News)

धर्मांतर विरोधी कायदा राज्यात व देशात लागू झाला पाहिजे या मागणीसाठी आमदार संग्राम जगताप यांच्या पुढाकारातून रविवारी (दि.22) अहिल्यानगर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.

मार्केटयार्ड चौकात झालेल्या सभेस आमदार संग्राम जगताप, आमदार गोपीचंद पडळकर, अ‍ॅड. वर्षा डहाळे व आदिनाथ पालवे महाराज आदींसह हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, महिला व कार्यकर्ते उपस्थित होते. या मोर्चात पेटत्या मशाली आणि धर्मांतरविरोधी कायद्याची मागणी करणारे फलक हाती घेऊन महिला सहभागी झाल्या होत्या.

आ.जगताप म्हणाले, वेगवेगळ्या मार्गाने सातत्याने हिंदू धर्मावर हल्ले होत आहेत. हे हल्ले थोपवण्यासाठी सर्वांनी धर्मासाठी एकत्र येणे आवश्यक आहे.

आमदार पडळकर म्हणाले, अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वात जास्त हिंदूंचे धर्मांतर झालेले आहे. त्यामुळे हिंदू नागरिकांनी जागरूक राहावे. अनेक जण अन्य धर्माचे पालन करतात; पण आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी कागदोपत्री एससी, एसटी किंवा ओबीसी असल्याचे दाखवतात. फसवणूक करणार्‍या शासकीय कर्मचार्‍यांचा शोध घेऊन त्यांच्या विरोधातही बडतर्फीची कारवाई झाली पाहिजे.

माझ्यासह आमदार संग्राम जगताप व मंत्री नितेश राणे यांनी हिंदू विरोधात होणार्‍या कटकारस्थानांना जशास तसे उत्तर देण्याचे ठरवल्याचे आमदार पडळकर यांनी स्पष्ट केले. ज्यांचे धर्मांतर झाले आहे, अशा व्यक्तींना पुन्हा हिंदू धर्मात आणण्यासाठी कायदा करावा, अशी मागणीही करत असल्याचे त्यांनी नमूद केले. या वेळी वर्षा डहाळे यांनीही मनोगत व्यक्त करत परखडपणे विचार व्यक्त केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT